Panvel News: पनवेलची तहान भागवण्यासाठी शिलार-पोशीर धरणांना हिरवा कंदील (फोटो-सोशल मीडिया)
Panvel News: पनवेल मुंबई महानगर क्षेत्रातील विस्तारीत भागाची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील शिलार आणि पोशीर धरणाच्या कामाला आता लवकरच सुरूवात होणार आहे. जलसंपदा विभागाने या कामाचे कार्यादेश कंत्राटदारांना नुकतेच दिले आहेत. पोशीर धरणाची उभारणी मे. प्रसाद एचईएस बेकेम तर शिलार धरणाची उभारणी मे. महालक्ष्मी एसईएल या कंपनीच्या माध्यमातून केले जाणार आहे. येत्या पाच वर्षात या धरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या योजनेच्या माध्यमातून पनवेल पालिका क्षेत्रातील ३८ लाख लोकांची तहान भागणार आहे.
पोशीर धरणातून १२.३४ टीएमसी तर शिलार धरणातून ६.६१ टीएमसी पाणी मिळणार आहे. या धरणाच्या पूर्ण झाल्यानंतर अनेक शहरांबरोबरच पनवेलकरांना याचा फायदा होणार असून पुढील ५० वर्षीचे नियोजन पनवेल महापालिकेकडून करण्यात येत आहे. या धरणाचे मुख्य उद्दिष्ट मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणे आहे. शिलार धरणामुळे कर्जत, कळंब, पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाणार आहे. भविष्यात याचा फायदा पनवेलकरांना मिळणार असून शिलार येथून पाणी माथेरानच्या डोंगरातून १२ ते १५ किलोमीटरच्या टनेल मधून पाणी पनवेलच्या देहरंग धरण्यात सोडण्यात येणार असून यामुळे लोकांची तहान भागणार आहे.
Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
पनवेल पालिकेसाठी पाण्याचे स्वतंत्र आरक्षण असावे असा प्रस्ताव व पत्रे या आधीच जलसंपदा विभागास पाठविण्यात आली असून त्याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या कोलाड येथील डोलवाल बंधाऱ्यातून प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभाग जलसंपदा कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर तो प्रस्ताव आता पाटबंधारे विभागाकडून शासनाला पाठवण्यात आला आहे.
पनवेल शहराला दररोज २८ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यापैकी आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणातून आठ एमएलडी, एमआयडीसीकडून पाच एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून १५ एमएलडी पाणी मिळते. नवी मुंबई विमानतळ, रेल्वे, औद्योगिक वसाहत व नवीन झालेल्या अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी पनवेलला पसंती दिली जात आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढत आहे.
उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली
पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन जवळपास आठ वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला असून महापालिका क्षेत्राअंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पनवेल महापालिकेस मुख्यत्वे सिडको, एमआयडीसी, जलसंपदा विभाग आदी प्रशासनावर अवलंबून रहावे लागत आहे.
त्यामुळे बऱ्याचवेळा या प्रशासनांकडून पाणी पुरवठ्याबाबत दिरंगाई झाल्यास त्याचा सर्वात जास्त त्रास महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याला होत असतो आणि त्यामुळे अनेक वेळा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पनवेलकरांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये या धरणांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. या निविदांना प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून जलसंपदा विभागाने पोशीर धरणाच्या उभारणीसाठी मे. प्रसाद एचइएस बेकेम (जेव्ही) यांना तर मे. महालक्ष्मी एसईएल (जेव्ही) यांना शिलार धरणाच्या उभारणीसाठी कार्यादेश दिले आहेत. यात धरण, सांडवा प्रणाली, पाणी पुरवठा तसेच विद्युत आणि इतर अनुषंगीक कामे केली जाणार आहेत.






