भारताकडून लाजिरवाण्या पराभवानंतर असीम मुनीरचा राग अनावर(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK, T20 World Cup 2026 : रविवारी, 15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने आले होते, या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केले. तर पाकिस्तानचे स्थान मात्र धोक्यात आले आहे. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानच्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचे स्थान धोक्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर या संपूर्ण प्रकरणावर नाराज असल्याचे वृत्त आहे.
एका वृत्तांनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील सुरू असलेल्या वादादरम्यान, मोहसिन नक्वी यांनी विधान केले होते की, ते पाकिस्तान सरकार किंवा कोणत्याही व्यक्तीला घाबरत नाहीत. या विधानात असीम मुनीर यांचे देखील नाव समोर आल्याने लष्करप्रमुखांना राग अनावर झाला आहे.
क्रिकेट आणि प्रशासनाशी संबंधित बाबी त्या व्याप्तीपुरत्या मर्यादित ठेवण्यात याव्यात आणि लष्करप्रमुखांचे नाव चर्चेत समाविष्ट करण्यात येऊ नये, असे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे मत असल्याचे पुढे येत आहे. म्हणूनच मुनीर आणि मोहसिन नक्वी या दोघांमधील तणावाचे वृत्त समोर येत आहे.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की क्रिकेटची काहीच समज नसलेली व्यक्ती आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष बनली आहे. जर नेतृत्वच मजबूत नसेल तर संघाची प्रगती तरी कशी होणार? असा प्रश्न देखील गोलंदाज शोएब अख्तर याने उपस्थित केला आहे.
हेही वाचा : AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास
शोएब अख्तर पुढे असाही म्हणाला की, अक्षम आणि अननुभवी व्यक्तीला उच्च पदावर नियुक्त करणे देशाच्या खेळासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. त्याचे विधान सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय होत आहे आणि पाकिस्तान क्रिकेटमधील वादविवादाला आणखीच खतपाणी घालत आहे. भारताविरुद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये केवळ संघाच्या कामगिरीवरच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि प्रशासकीय निर्णयांवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.






