फोटो सौजन्य: Social Media
‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे’ हे वाक्य आपण नेहमी वाचत किंवा ऐकत असतो. जर देशाचा शेतकरी कणखर असेल तरच देश मजबूत होईल, असे अनेक जणांचे विचार आहेत. म्हणूनच तर देशातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना आणत असतात. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर केलीच जातेच, पण त्याव्यतिरिक्त त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवण्याचे काम देखील केले जाते. सरकार अनेक व्यवसायांना चालना देत असतात, त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन व्यवसाय (Fish Farming).
केंद्र आणि राज्य सरकारने मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. याअंतर्गत, मच्छीमार आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक सवलती दिल्या जात आहेत.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या नेतृत्वाखालील तेथील सरकार अनुसूचित जमातीच्या वर्गाला आणि महिलांना मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ६०% पर्यंत अनुदान देत आहे, जेणेकरून या वर्गातील लोकही मत्स्यपालनाचा अवलंब करू शकतील आणि त्यांचे जीवनमान वाढवू शकतील. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होत आहे.
दंतेवाडा जिल्ह्यातील मलवाडा गावातील प्रगतीशील शेतकरी जयराम कश्यप यांनी मत्स्यपालनातून आपली आर्थिक स्थिती मजबूत केलं आहे. यामुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहे. पारंपारिक शेतीतून मर्यादित उत्पन्न मिळवणाऱ्या जयराम यांनी २०१७ मध्ये आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर तलाव बनवून मत्स्यपालनाला सुरुवात केली. या योजनांचा फायदा घेत, मत्स्यव्यवसाय विभागाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी २०२३-२४ मध्ये त्यांच्या १.२५ एकर जमिनीवर एक तलाव बांधला आणि २५ डेसिमल जमिनीत एक पाउंड-लाइनर देखील बसवला.
सघन मत्स्यपालन तंत्रज्ञानाचा अवलंब करून, जयराम कश्यप यांनी रोहू, कटला, मृगल आणि कॉमन कार्प सारख्या माशांच्या प्रगत जातींचे संगोपन केले. सारंगी (फंगल) सारख्या माशांच्या बिया त्यांच्या पाउंड-लाइनरमध्ये तयार केल्या जातात. तलावांमध्ये ऑक्सिजनचा सतत पुरवठा होत असतो आणि वैज्ञानिक पद्धतींनी माशांची चांगली काळजी घेतली जाते.
कश्यप मत्स्यव्यवसायातून दरवर्षी ५.५० लाख रुपये नफा कमवत आहे, जो त्याच्या शेती उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्याचे दोन्ही मुलगे त्यांना या व्यवसायात मदत करत आहेत. स्थानिक बाजारपेठेत माशांना जास्त मागणी असल्याने त्यांच्या तलावातील मासे सहज विकले जातात.
छत्तीसगड राज्यात मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी, मच्छिमारांना तलाव बांधणी, उपकरणे, पूरक अन्न आणि मत्स्यबीज यासाठी अनुदान दिले जात आहे. जयराम कश्यप म्हणाले की, ते त्यांच्या तलावाजवळ पोल्ट्री शेड बांधून त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
छत्तीसगड सरकारच्या योजना आणि जयराम कश्यप सारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे दंतेवाडा जिल्ह्यात मत्स्यपालन हा एक शाश्वत व्यवसाय बनला आहे. जयराम कश्यप यांचे हे यश परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही मत्स्यपालनाकडे आकर्षित करत आहे.