उधारीच्या 500 रुपयातून उभारला व्यवसाय; आज महिला करतीये वार्षिक 5 कोटींचा टर्नओव्हर!
देशात अनेकांनी आपल्या हाती शून्य असताना अर्थात मागे-पुढे काहीही नसताना व्यवसायाच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभे केले आहे. जिद्द, मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर जगात अशक्य असे काहीही नसते. याच त्रिसूत्रीच्या जोरावर अनेकांनी मोठे-मोठे व्यवसाय उभारले आहे. आज आपण अशाच एका महिलेची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्याकडे काहीही नसताना, उधारीचे ५०० रुपये घेऊन आणि ट्रेनच्या पटरीवर काम करून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.
सुरुवातीला काढले हलाखीचे दिवस
कृष्णा यादव असे या महिलेचे नाव असून, त्या आज एक सफल उद्योजिका बनल्याचे आहे. कृष्णा यादव या उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवाशी आहेत. त्यांची यशोगाथा आज देशभरातील तरुणी, महिला यांच्यासाठीच नाही तर तरुणांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहे. आयुष्यात सुरुवातीच्या काळात त्या गंभीर आर्थिक तंगीमधून जात होत्या.
हेही वाचा : अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी…नाही होणार कमाई!
विशेष म्हणजे त्यांच्या पतीची नोकरी गेल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मात्र, त्या डगमगल्या नाही. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत, काहीही छोटेखानी उद्योग सुरु करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्या पतीसोबत बुलंदशहर येथून दिल्लीला राहायला आल्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला खरी गती मिळाली.
सुरुवातीच्या नफ्यातून वाढला आत्मविश्वास
सुरुवातीच्या काळात कृष्णा यादव यांच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे देखील नव्हते. त्यावेळी त्यांनी एका नातेवाईकाकडून ५०० रुपये उधारीचे घेऊन, आपला लोणचे तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. हळूहळू व्यवसायाला मिळणारी गती पाहून त्यांनी पुन्हा ३००० रुपये गुंतवणूक करून आपला व्यवसाय वाढवला. त्यातून त्यांना 5,250 रुपयांचा नफा झाला. मात्र, हा त्यांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरला. त्यांनी आपल्या लोणचे व्यवसायाच्या वृद्धीसाठी थेट विक्री सुरु केली.
आज आहेत कोट्यवधींच्या मालकीण
आज त्यांनी ‘श्री कृष्णा पिकल्स’ या ब्रँड नावाने आपला लोणचे बनवण्याचा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. नातेवाइकांकडून उधारीचे ५०० रुपये घेऊन, सुरु केलेल्या त्यांच्या व्यवसायाचा आज वार्षिक ५ कोटींचा टर्नओव्हर होत आहे. त्यामुळे आज त्या देशातील अनेक महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरल्या असून, अनेक जण त्यांना रोल मॉडेल मानत आहे. विशेष म्हणजे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील त्यांचा सन्मान झाला आहे.