टेक महिंद्राच्या नफ्यात तब्बल 153.5 टक्क्यांनी वाढ; कंपनी गुंतवणुकदारांना देणार लाभांश!
आयटी क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी असलेल्या टेक महिंद्राने आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीचे म्हणजेच सप्टेंबर तिमाहीची आपली आकडेवारी जाहीर केली आहे. सप्टेंबर तिमाहीत, टेक महिंद्रा कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 153.5 टक्क्यांनी वाढून, 1250 कोटी रुपये इतका झाला आहे. तर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा तिमाही-दर-तिमाही आधारावर 46.81 टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीकडून लाभांश देण्याचीही घोषणा
इतकेच नाही तर कंपनीने सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासोबतच, टेक महिंद्रा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 1 नोव्हेंबर ही अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. दरम्यान, टेक महिंद्राचा शेअर शुक्रवारी (ता.१८) बाजार बंद होताना 0.6 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 1687 रुपयांवर बंद झाला होता. आर्थिक तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर आणि अंतरिम लाभांश जाहीर झाल्यानंतर सोमवारी (ता.२१) कंपनीच्या शेअरमध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या महसुलात मोठी वाढ
टेक महिंद्रा कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीतील इतर आकडेवारी पाहिल्यास, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 3.5 टक्क्यांनी वाढून, 13313 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. स्थिर चलन अटींनुसार, सप्टेंबर तिमाहीत टेक महिंद्रा कंपनीचा महसूल 0.30 टक्क्यांनी वाढला आहे. वार्षिक आधारावर तो 1.2 टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबर तिमाहीत, टेक महिंद्रा कंपनीचा कर मार्जिन तिमाही आधारावर 280 बीपीएसने वाढून, 9.4 टक्के झाला आहे. तर वार्षिक आधारावर, त्यात 560 बीपीएसची वाढ दिसून आली आहे.
कशी आहे कंपनीच्या महसुलाची स्थिती
सप्टेंबरच्या तिमाहीत टेक महिंद्रा कंपनीचा आयटी आकर्षण दर 11 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जो आर्थिक वर्ष 2025 च्या जून तिमाहीत 10 टक्के होता. सप्टेंबरच्या तिमाहीत, कम्युनिकेशन व्हर्टिकलमधून कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 1.7 टक्क्यांनी घसरला. तर बीएफएसआय 4.5 टक्क्यांनी वाढला. याशिवाय, सप्टेंबरच्या तिमाहीत तंत्रज्ञान मीडिया एंटरटेनमेंट व्हर्टिकलमधून कंपनीचा महसूल 2.4 टक्क्यांनी वाढला आहे.