File Photo : Onion Market
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कांदा दराने मोठी उसळी घेतली आहे. राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दर हे ४००० रुपये प्रति क्विंटलहून अधिक पाहायला मिळत आहे. तर काही बाजार समित्यांमध्ये कांदा दराने ५००० रुपये प्रति क्विंटल पल्ला गाठला आहे. देशपातळीवर सर्वच भागांमध्ये कांदा दर वाढलेले आहे. अर्थात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतानाच, केंद्रातील सरकारकडून कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याची माहीती
एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राला केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत देशात सणासुदीचा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातील कांदा बाहेर काढला जाणार आहे. त्यामुळे आता ज्याचा थेट परिणाम हा कांदा दरावर होणार असून, शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार
दरम्यान, सध्याच्या घडीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि आसपासच्या भागात ग्राहकांना ६० रुपये प्रति किलो दराने सरकारकडून स्वस्तात कांदा पुरवला जात आहे. घाऊक बाजारात सध्या कांदा दर सरासरी ४००० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्र सरकारने राखीव साठ्यातील कांदा बाहेर काढल्यास, दरात मोठी घसरण दिसून येणार आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
हे देखील वाचा – विकायला काढली होती सरकारने ‘ही’ कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!
आजचे राज्यातील कांदा बाजारभाव
आशियातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा दर कमाल 4700 रुपये, किमान 2000 रुपये तर सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल असल्याचे पाहायला मिळाले. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज कांदा दर कमाल 4451 रुपये, किमान 2200 रुपये तर सरासरी 3900 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज कांदा दर कमाल 4500 रुपये, किमान 3300 रुपये तर सरासरी 3900 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज कांदा दर कमाल 5000 रुपये, किमान 1500 रुपये तर सरासरी 3400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.