फोटो सौजन्य - Social Media
छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्याच्या नर्मदापूर या छोट्याशा गावात राहणारा एक तरुण, अभिषेक सिंह राजपूत, आज नव्या पिढीच्या आशा-अभिलाषांचा चेहरा बनला आहे. शहरी झगमगाटापासून दूर, अत्यंत साध्या पार्श्वभूमीत वाढलेला हा तरुण, आज विविध व्यवसायांत यशस्वी वाटचाल करत आहे. तीही प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळं काम करत. बारावीनंतरच अभिषेकने ठरवलं होतं की आपल्याला काहीतरी स्वतःचं उभं करायचं आहे. कॉलेजमध्ये बीए इंग्लिश करत असतानाच त्याने आपला पहिला स्टार्टअप सुरू केला. त्याचा एक विश्वास होता “हंगाम बदलतात, गरजा बदलतात, संधी पण येतात; फक्त आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजेत.”
उन्हाळ्यात जेव्हा गावात लग्नसराई असते, तेव्हा अभिषेक वाढदिवस, लग्न आणि इतर खास प्रसंगांसाठी सजावटचं काम करतो. नवऱ्याची गाडी सजवण्यापासून ते संपूर्ण व्हेन्यूच्या डेकोरेशनपर्यंत सर्व जबाबदाऱ्या तो स्वतः पार पाडतो. पावसाळा सुरू झाला की, तो स्टेशनरी व पुस्तकांचा व्यवसाय सुरू करतो. शाळा-कॉलेज उघडल्यावर विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून गावातच दुकान सुरू करून त्याने शहरावरची अवलंबनता कमी केली आहे.
हिवाळ्यात अभिषेकचा व्यवसाय अजून वेगळा रंग घेतो. तो गावाजवळील निसर्गरम्य ठिकाणी टेन्ट कॅम्पिंगची व्यवस्था करतो. तिथे पर्यटकांना बर्फाळ हवामानात हॉटेलसारख्या सुविधा टेन्टमध्ये मिळतात. ही कल्पना त्याला एका सनसेट पॉइंटला भेट दिल्यानंतर सुचली, जिथे त्याने पाहिलं की तिथे आलेल्या पर्यटकांना मुलभूत सोयीसुद्धा मिळत नव्हत्या. या सगळ्या प्रवासात त्याच्या पाठीशी कायमपणे उभं राहिलं ते त्याचं कुटुंब. त्यांच्या पाठबळामुळेच त्याला प्रत्येक अडथळा पार करता आला. गावातील सेंट्रल बँकेजवळ असलेली त्याची स्टेशनरी दुकान आता गावासाठी एक महत्त्वाचं केंद्र बनली आहे.
अभिषेकचा विश्वास आहे की, तरुणांनी केवळ मोबाईलमध्ये गुंतून न राहता प्रत्यक्ष जीवनकौशल्यं शिकायला हवीत. ‘‘नोकरी मिळेपर्यंत हातावर हात न ठेवता काहीतरी करायला हवं. यातून आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ समजतो,’’ असं तो सांगतो. गावातील युवकांना रोजगार देणारे त्याचे तीन हंगामी व्यवसाय म्हणजे फक्त उद्योग नव्हे, तर नव्या युगातील ग्रामीण उद्योजकतेचं उदाहरण आहेत. अभिषेकसारखे तरुणच आजच्या भारताला आत्मनिर्भरतेकडे नेतील, हे निश्चित.