फोटो सौजन्य - Social Media
अनीस अहमद यांनी सिद्ध केलं आहे की योग्य विचार आणि मेहनत असेल, तर कोणतीही वस्तू वाया जात नाही. नारळाच्या सालांपासून त्यांनी असा व्यवसाय उभा केला, जो आज वर्षाला तब्बल ₹७५ कोटींचा टर्नओव्हर करतो. ग्लोबल ग्रीन नावाच्या स्टार्टअपचे ते संस्थापक आहेत, जे नारळाच्या सालांपासून कोकोपीट तयार करतं. कोकोपीटचा उपयोग शेती, नर्सरी आणि ग्रीनहाऊस उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय, त्यापासून कॉयर पॉट, ईंट, ब्लॉक आणि ग्रो बॅग सुद्धा बनवले जातात.
अनीस अहमद यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यांचे वडील नारळाच्या व्यवसायात होते, त्यामुळे त्यांनी त्याचे महत्त्व जवळून पाहिले. शिक्षणादरम्यान त्यांना समजले की अनेक देशांत पीट मॉस चा वापर केला जातो, पण त्यातून मीथेन गॅस बाहेर पडतो, जो पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे त्यांनी कोकोपीट हा त्याचा उत्तम पर्याय म्हणून निवडला आणि त्यातूनच त्यांच्या व्यवसायाची कल्पना साकार झाली.
अनीस यांनी २०१४ मध्ये ‘ग्लोबल ग्रीन’ ची स्थापना केली. या कंपनीचे उद्दिष्ट नारळाच्या सालींपासून कोकोपीट तयार करून मातीची सुपीकता वाढवणे हे होते. प्रथम कोकोपीट पाण्याने धुऊन अशुद्धी काढून टाकली जाते, त्यानंतर त्याचे चुरे केले जातात. नंतर त्यापासून ब्लॉक, डिस्क आणि ग्रो बॅग तयार करून विक्री केली जाते. आज ग्लोबल ग्रीन कंपनी केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मिडल इस्ट या देशांतही कोकोपीटचा मोठ्या प्रमाणावर निर्यात करत आहे. कोकोपीट ही मातीची उत्तम जागा घेऊ शकणारी पर्याय आहे आणि फळबाग, हायड्रोपोनिक्स आणि ऑर्गेनिक शेतीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
कोकोपीटचे अनेक फायदे आहेत. हे पाण्याची नमी टिकवून ठेवते, त्यामुळे झाडांना अधिक काळ पाणी मिळते. पर्यावरणपूरक असल्याने ऑर्गेनिक शेतीसाठी उपयुक्त आहे. यामुळे मातीचा धूप थांबतो आणि सुपीकता वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत करते, कारण हा पीट मॉसचा उत्तम पर्याय आहे. अनीस अहमद यांची कहाणी नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. एका छोट्या कल्पनेला मेहनतीच्या जोरावर त्यांनी मोठ्या व्यवसायात रूपांतरित केलं. आज त्यांची कंपनी केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली ओळख निर्माण करत आहे. ही कथा सिद्ध करते की योग्य दृष्टिकोन आणि परिश्रमामुळे वाया जाणाऱ्या वस्तूंपासूनही कोट्यवधींचे साम्राज्य उभे करता येते!