20 हजार नोकऱ्या, 20,000 कोटींची गुंतवणूक; 'या' जिल्ह्यात उभारला जाणार टोयोटाचा प्लांट!
मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रासाठी आज (ता.३१) सोन्याचा दिवस ठरला आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी तब्बल २०,००० कोटींची गुंतवणूक करून, छत्रपती संभाजीनगर येथे कार उत्पादक प्लांट उभारला जाणार आहे. या प्लांटच्या उभारणीनंतर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात एकूण ८,००० हून तरुणांना प्रत्यक्ष तर १२००० जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने देखील ही बातमी महत्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने आज (ता.३१) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(फोटो सौजन्य : एक्स हॅन्डल)
हेही वाचा : आतापर्यंत 6 कोटी करदात्यांनी भरला आयटीआर; आज शेवटची मुदत, …न भरल्यास होऊ शकतो तुरुंगवास!
कर्नाटकात कंपनीचे दोन प्लांट
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे मुख्यालय कर्नाटकात आहे. सध्याच्या घडीला कंपनीचे कर्नाटकात दोन प्लांट कार्यरत आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या याच प्लांटमध्ये टोयोटा फॉर्च्यूनर, इनोवा क्रिस्टा आणि हायरायडर यांसारख्या नामांकित कारची निर्मिती करण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने एकट्या कर्नाटकात 16,000 कोटीं रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. याशिवाय कंपनीने आतापर्यंत दोन्ही प्लांटच्या माध्यमातून तब्बल 86,000 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नोकरी दिली आहे.
हेही वाचा : जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; …म्हणाले ‘हे’ करावेच लागेल!
करणार वर्षाला ४ लाख कारचे उत्पादन
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने आपल्या या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कारचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पुढील तीन वर्षांत या प्लांटमधून वाहनांचे उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे. कंपनी कर्नाटकात आणखी एक नवीन प्लांट उभारण्याच्या योजनेवर देखील काम करत आहे. वर्ष 2026 पर्यंत कर्नाटकातील तिसऱ्या प्लांटमध्ये वाहनांचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. असे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीकडून सांगण्यात आले आहे.