जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; ...म्हणाले 'हे' करावेच लागेल!
देशभरात जीवन विमा आणि आरोग्य विमा यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. याशिवाय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) देखील वेळोवेळी आपल्या नियमात अनुकूल बदल करत असते. याशिवाय आतापर्यंत अनेकांनी जीवन विमा आणि आरोग्य विमा यांच्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे जीवन विमा आणि आरोग्य विमा यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.
आकारला जातो 18 टक्के जीएसटी
सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून जीवन विमा आणि आरोग्य विमा यावर तब्बल 18 टक्के जीएसटी लागू केला जातो. मात्र, आता वेळोवेळी होणाऱ्या जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटीत कपात करण्याच्या मागणीत नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : उधारीच्या 500 रुपयातून उभारला व्यवसाय; आज महिला करतीये वार्षिक 5 कोटींचा टर्नओव्हर!
सामान्यांचे जीवन, वैद्यकीय विमा महत्वाचा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, अर्थमंत्र्यांनी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांना बळकट करण्यासाठी पावले उचलण्याचे गरजेचे आहे. याशिवाय विमा घेतल्यानंतर सामान्यांना कर कपातीबाबत देखील दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रीमियमवरील आयकर कपात पुन्हा सुरू करावी. संपूर्ण समाजाचे जीवन आणि वैद्यकीय विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : LIC ची भन्नाट योजना..! एकदाच गुंतवा पैसे, मिळेल आयुष्यभर 1 लाख रुपये पेन्शन!
…तर लोकांचा कल आणखी वाढेल!
दरम्यान, जीवन विमा किंवा आरोग्य विमा यावर जीएसटी लागू करणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर आकारण्यासारखे आहे. असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलत असेल तर त्याला कर सवलत दिलीच पाहिजे. त्यांच्यावर जीएसटी लादून आपण त्यांना निराश करू नये. अर्थमंत्र्यांनी जनतेला हा दिलासा दिल्यास जीवन आणि वैद्यकीय विम्याकडे लोकांचा कल आणखी वाढेल, असेही नितीन गडकरी यांनी अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.