6 कोटी करदात्यांनी भरला आयटीआर; आज शेवटची मुदत, ...न भरल्यास होऊ शकतो तुरुंगवास!
आज आयटीआर (इन्कम टॅक्स रिटर्न) फाईल करण्याची शेवटची तारीख आहे. आतापर्यंत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कोट्यवधी करदात्यांनी आपला आयटीआर भरला आहे. आतापर्यंत देशातील जवळपास 6 कोटी करदात्यांनी आपला आयटीआर फाईल केला आहे. विशेष म्हणजे आता सरकारकडून आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढण्याची कोणतीही शक्यता दिसत नाहीये. त्यामुळे आज तुम्ही आपला आयटीआर फाईल न केल्यास, तुम्हाला दंडासह आयटीआर फाईल करावा लागू शकतो. इतकेच नाही तर कर चुकवेगिरीच्या मुद्दावरून आयकर कायद्यानुसार तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो.
६ कोटी करदात्यांनी केला आयटीआर फाईल
केंद्रीय आयकर विभागाने आयटीआर (इन्कम टॅक्स रिटर्न) फाईल करण्याची अखेरची मुदत ३१ जुलै २०२४ ही निश्चित केली आहे. आज ३१ जुलै ही तारीख संपणार आहे. याबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे की, “आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत देशातील एकूण ६ कोटी करदात्यांनी आपला आयटीआर फाईल केला आहे. तर मागील आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये याच कालावधीत एकूण 8.61 करदात्यांनी आपला आयटीआर फाईल केला होता.”
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; …म्हणाले ‘हे’ करावेच लागेल!
70 टक्के करदात्यांनी निवडली नवीन कर प्रणाली
महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या पोस्ट अर्थसंकल्पीय सत्राला संबोधित करताना ही माहिती दिली. सध्याच्या घडीला अनेक करदाते हे नवीन कर प्रणालीच्या माध्यमातून आपला आयटीआर फाईल करत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण आयटीआर फाईल केलेल्यांपैकी 70 टक्के करदात्यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत आपला आयटीआर फाईल केला आहे.
हेही वाचा : उधारीच्या 500 रुपयातून उभारला व्यवसाय; आज महिला करतीये वार्षिक 5 कोटींचा टर्नओव्हर!
आज आयटीआर न भरल्यास काय होणार?
कोणत्याही प्रकारचा दंड न भरता आयटीआर भरायचा असेल आज तुम्हाला शेवटची मुदत आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला आयटीआर भरताना दंडाची रक्कम देखील अतिरिक्त भरावी लागणार आहे. इतकेच नाही तर ३१ डिसेंबरपर्यंत दंडाच्या रकमेसह आयटीआर न भरल्यास तुम्हाला तुरुंगवास देखील होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर २०२४ नंतर आयटीआर दाखल करण्याची संधी कोणत्याही करदात्याला मिळणार नाही. यानंतर आयकर विभाग थेट करचुकवेगिरीबाबत कारवाई करेल. असे सांगण्यात आले आहे.