नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 2023 -24 च्या अर्थसंकल्पामध्ये अनेक दिलासादायक घोषणा केल्या आहेत. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. इन्कम टॅक्सबद्दल (Income Tax) सांगायचं तर करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवून 7 लाख करण्यात आली आहे. याचाच अर्थ सात लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही. महिलांसाठी महिला बचत सन्मान पत्राची घोषणा करण्यात आली आहे. यात त्यांना बचतीवर साडे 7 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) बचत योजनेतील डिपॉजिटची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
महिलांसाठी बचत सन्मान पत्र
अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी महिला बचत सन्मान पत्र (Mahila Samman Saving Certificate) आणलं आहे. या माध्यमातून महिलांना बचतीवर चांगले रिटर्न्स मिळतील. महिला बचत सन्मान पत्रामध्ये महिलांना 7.5 टक्के रिटर्न मिळणार आहे. महिला सन्मान सेव्हींग सर्टिफिकेट दोन वर्षांसाठीची योजना आहे. अर्थात ही योजना 2025 पर्यंतच असेल. ही एक वन टाइम न्यू सेव्हींग स्कीम आहे.
ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्यात येणार आहे. केवळ आर्थिक मदतच नाही तर त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांनाही फायदा
निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांनाही मोठं गिफ्ट दिलं आहे. अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सेव्हींग स्कीम्समध्ये कमाल रक्कम जमा करण्याची मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा 15 लाख रुपयांवरून वाढून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच जॉइंट अकाउंट्समध्ये मंथली इन्कम स्कीम लिमिटही दुप्पट करण्यात आली आहे.
तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी खास भेट
अर्थसंकल्पामध्ये लहान मुलं आणि तरुणांकडेही लक्ष देण्यात आलं आहे. अर्थमंत्र्यांनी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे लहान मुलं आणि किशोरवयीन मुलं यांना फायदा होणार आहे. या लायब्ररीमध्ये भूगोल आणि साहित्य या विषयासह अनेक विषयांवरची पुस्तके असतील. अर्थमंत्र्यांनी 157 नवीन नर्सिंग कॉलेज तयार करण्याची घोषणा केली आहे. रोजगाराविषयी सांगायचं तर 38,800 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच 740 एकलव्य मॉडल रेसिडेन्शियल स्कूल्ससाठी सपोर्ट स्टाफ भरती केला जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 लॉन्च करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. तसेच 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरची निर्मिती केली जाणार आहे.