भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांना फायदा! वाचा... दरवाढीचे नेमके कारण
गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला पिकांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने बटाटा, टोमॅटो, कांदा यासह सर्वच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहे. या वाढलेल्या भाजीपाला दरांमुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे. तर याउलट सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र आर्थिक बजेट कोडमडले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला भाजीपाल्याचे दर नेमके चढतीला का लागले आहेत. याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
उष्णतेच्या लाटेच्या परिणाम
एप्रिल आणि मे महिन्यात देशातील बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत होती. ज्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये नुकत्याच लागवड झालेल्या भाजीपाला पिकांना उष्णतेचा मोठा फटका बसला. अर्थात मागील दोन महिन्यात देशातील भाजीपाला उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली. परिणामी, सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक मोठया प्रमाणात घटली आहे. अर्थात मागणी आणि पुरवठा हे बाजाराचे अर्थशास्त्रीय सूत्र विस्कळीत झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढलेले पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य : istock)
काही भागांमध्ये पावसाची तूट
दरम्यान, उन्हाळ्यात सर्वत्र भाज्यांचा तुटवडा असतो. मात्र, यंदा पावसाळा सुरु झाला तरी भाज्यांची टंचाई पाहायला मिळत आहे. यावर्षी देशातील काही भागात मॉन्सूनचा पाऊसही उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळे देखील भाजीपाला पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. चालू हंगामात देशातील काही भागांमध्ये मॉन्सूनच्या पावसात 18 टक्के तूट दिसून आली आहे. ज्यामुळे थेट भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे.
… तर भाज्यांचे दर कमी होतील
दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, “उष्मा आणि कमी पाऊस यामुळे भाजीपाला आणि फळांच्या पिकांवर परिणाम झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास ही समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी होऊ शकतात. सध्या काही भागातत चांगला पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.”
टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ
दरम्यान, सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आणि मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले आहे. परिणामी, टोमॅटोचे दर अनेक भागांमध्ये शंभरीपर्यंत वाढले आहे. मात्र, येत्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.