गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; हा तगडा आयपीओ लवकरच खुला होणार, वाचा... काय आहे किंमत पट्टा!
सोलर पीव्ही मॉड्यूल तयार करणाऱ्या वारी एनर्जीज या कंपनीच्या आयपीओची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या आयपीओचे शेअर अलॉटमेंट पूर्ण झाले असून, 28 ऑक्टोबर रोजी ही कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध होणार आहे. दरम्यान, हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता, तेव्हा त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या आयपीओची ग्रे मार्केटमधील स्थिती पाहून अनेक गुंतवणूकदारांनी खुल्या हाताने गुंतवणूक केली. मात्र, आता ही कंपनी सूचिबद्ध होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असताना, नवीन माहिती समोर आल्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.
गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
वारी एनर्जीज हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला. तेव्हा प्रत्येक शेअरचे मूल्य 1503 रुपये होते. हा आयपीओ काही दिवसांपूर्वी ग्रे मार्केटमध्ये सुसाट वेगाने धावत होता. ग्रे मार्केटमध्ये या शेअरचे मूल्य थेट 100 टक्क्यांनी वधारले होते. मात्र, आता याच ग्रे मार्केटमध्ये स्थिती वेगळी आहे. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असताना ग्रे मार्केटमधील घडामोडी अनेकांसाठी धाकधूक वाढवणारी ठरली आहे. वारी एनर्जीज ही कंपनी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) 28 ऑक्टोबर रोजी सूचिबद्ध होणार आहे.
हे देखील वाचा – आयसीआयसीआय बँकेचा विक्रम, केवळ 3 महिन्यात बँकेला 11746 कोटी रुपयांचा नफा!
दुप्पट रिटर्न्स मिळणार का?
आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता. त्या काळात त्याची ग्रे मार्केटमधील स्थिती पाहून, 28 ऑक्टोबर रोजी ही कंपनी आपल्या गुंतवणूकादारांचे पैसे थेट दुप्पट करणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. आता, मात्र या कंपनीच्या शेअरचे ग्रे मार्केटमधील मूल्य कमी झाले आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. हीच स्थिती पाहून दुप्पट रिटर्न्स मिळणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
ग्रे मार्केटमध्ये काय आहे स्थिती?
शेअर अलॉटमेंटच्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये या शेअरचे मूल्य 1590 रुपये म्हणजेच साधारणपणे 105.79 टक्क्यांवर होते. आता याच शेअरचे मूल्य 1225 रुपये प्रति शेअर म्हणजेच साधारण 81.5 टक्क्यांच्या जीएमपीवर आहे. म्हणजेच जीएमपीमध्ये वारी एनर्जीजचा शेअर साधारण 23 टक्क्यांनी घसरला आहे. याच कारणामुळे गुंतणूकदारांमध्ये सध्या धाकधूक आहे. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये सध्या चढउतार होत असले तरी कंपनीची सध्याची स्थिती आणि लिस्टिंगच्या दिवशीचा शेअर बाजाराचा कल यावर वारी एनर्जीजचा शेअर शेअर बाजारात किती रुपयांवर सूचिबद्ध होणार, हे अवलंबून आहे, असे शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत.
आयपीओला मिळाला होता दमदार रिस्पॉन्स
वारी एनर्जीज ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 4,321.44 कोटी रुपये उभारणार आहे. 21 ते 23 ऑक्टोबर या काळात हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता. या काळात आयपीओला दमदार प्रतिसाद मिळाला होता. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने एकूण 3,600.00 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी केले आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)