आयसीआयसीआय बँकेचा विक्रम, केवळ 3 महिन्यात बँकेला 11746 कोटी रुपयांचा नफा!
देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने कमाईचा विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 14.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात केवळ तीन महिन्यात बँकेला 11746 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
दिवाळीपूर्वी देशातील बहुतांश कंपन्या आणि बँकांचे निकाल जाहीर होत आहेत. अशातच आता देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, बॅंकेच्या नफ्यात कमालीची वाढ झाल्याची माहिती दिली आहे. या कालावधीत बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 14.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
निव्वळ नफ्यात 14.5 टक्क्यांनी वाढ
आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत तिचा निव्वळ नफा 14.5 टक्क्यांनी वाढून, 11746 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा 10,261 कोटी रुपये इतका नोंदवला गेला होता. त्यामुळे यंदा बॅंकेला तब्बल 1,485 कोटींचा अधिक फायदा झाला आहे.
हे देखील वाचा – येस बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचे कारण काय? 5 दिवसांत 9 टक्क्यांनी ढेपाळला!
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबरमध्ये बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 47,714 कोटी रुपये झाले होते. जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 40,697 कोटी रुपये होते. केवळ व्याजातून बँकेचे उत्पन्न वाढून 40,537 कोटी रुपये झाले आहे. जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 34,920 कोटी रुपये होते. त्याच वेळी, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 9.5 टक्क्यांनी वाढून, 20,048 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 18,308 कोटी रुपये होते. व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
बँक कर्जाच्या गुणवत्तेत सुधारणा
या कालावधीत आयसीआयसीआय बँकेने वितरीत केलेल्या कर्जाची माहिती आणि त्याचा दर्जाही शेअर केला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस, बँकेचा ढोबळ एनपीए (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) त्याच्या एकूण कर्ज अग्रिमाच्या 1.97 टक्क्यांवर आला आहे. एका वर्षापूर्वी बँकेचा एकूण एनपीए 2.48 टक्के होता. अशा स्थितीत बँकेचा निव्वळ एनपीए 0.42 टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीअखेर 0.43 टक्के होता.
एकत्रित आधारावर बँकेच्या निव्वळ नफ्यात 19 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत तो 12,948 कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 10,896 कोटी रुपये होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने आयसीआयसीआय बँकेला देशातील 3 प्रमुख बँकांमध्ये स्थान दिले आहे. आरबीआयच्या Too Big To Fail या श्रेणीमध्ये त्याचा समावेश आहे. एसबीआय आणि एचडीएफसी बँक या दोनच बँकांची नावे या श्रेणीत येतात.