फोटो सौजन्य - Social Media
जसे-जसे तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे, तसतसे नोकरीच्या अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. मात्र, काही संधी संपुष्टातही येत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, येत्या काही वर्षांत कोट्यवधी नोकऱ्या कमी होतील, तर सुमारे १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील. या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांमध्ये काही महत्त्वाची कौशल्ये असणे आवश्यक आहे. यामध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी (Analytical Thinking) महत्त्वाची असून समस्यांचे सखोल विश्लेषण करून योग्य समाधान शोधण्याची क्षमता आवश्यक आहे. लवचीकता, अनुकूलनशीलता आणि चपळता (Resilience, Flexibility and Agility) म्हणजे बदलत्या परिस्थितींमध्ये स्वतःला जुळवून घेण्याचे कौशल्य होय. नेतृत्व व सामाजिक प्रभाव (Leadership and Social Influence) म्हणजे लोकांना प्रेरित करून योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याची क्षमता असते.
रचनात्मक विचारसरणी (Creative Thinking) नव्या आणि अनोख्या कल्पनांच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाची ठरते. प्रेरणा आणि आत्म-जागरूकता (Motivation and Self-awareness) यामध्ये स्वतःला प्रेरित ठेवून स्वतःच्या भावना ओळखण्याची कला येते. तंत्रज्ञान साक्षरता (Technological Literacy) म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान समजून त्याचा योग्य वापर करण्याचे कौशल्य आहे.
त्याचबरोबर सहानुभूती आणि सक्रिय ऐकणे (Empathy and Active Listening) हे कौशल्य अधिक महत्त्वाचे ठरते कारण इतरांच्या भावना समजून घेण्याची आणि त्यांना त्यांच्या समस्यांविषयी संपूर्ण लक्ष देऊन ऐकण्याची कला व्यक्तीच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडवते. हे कौशल्य संघटनेत टीमवर्क वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. जिज्ञासा आणि आजीवन शिक्षणाची सवय (Curiosity and Lifelong Learning) ही सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी दर्शवते, ज्यामुळे बदलत्या उद्योग-क्षेत्राशी सुसंगत राहणे सुलभ होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या कामाच्या पद्धती वेगाने बदलत असल्यामुळे हे कौशल्य तरुणांना नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रेरित करते.
प्रतिभा व्यवस्थापन (Talent Management) म्हणजे योग्य व्यक्तींच्या क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्याचे कौशल्य होय. हे केवळ एचआर क्षेत्रापुरते मर्यादित नाही तर प्रत्येक व्यवस्थापकासाठी महत्त्वाचे कौशल्य मानले जाते. शेवटी, सेवा अभिमुखता व ग्राहक सेवा (Service Orientation and Customer Service) ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना समाधान देण्यावर आधारित आहे. ग्राहकांना त्यांच्या अपेक्षांपेक्षा अधिक समाधान देण्यासाठी याचा उपयोग होतो, ज्यामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेत वाढ होते. ही सर्व कौशल्ये आत्मसात केल्यास तरुणांना केवळ चांगल्या नोकऱ्याच नव्हे तर करिअरमध्ये दीर्घकालीन यश मिळवण्याच्या दृष्टीनेही मोठी मदत होऊ शकते.