दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका आता ऑनलाइन केंद्रावर (फोटो- ai gemini)
पुढील वर्षापासून राज्यभर नवी प्रणाली
‘शिक्षण संक्रमण’ मासिक पूर्णपणे डिजिटल
सीएसआर च्या माध्यातून विद्यार्थ्यींचे शुल्क भरणार नवा उपक्रम
सोनाजी गाढवे / पुणे: दहावी आणि बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर पाठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यासाठी आवश्यक संगणक, प्रिंटर, सॉफ्टवेअर, वायफाय आणि अन्य डिजिटल सुविधा राज्य मंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात सोमवारी दिंनाक २ जून पुणे येथील राज्य मंडळाच्या कार्यालयात झालेल्या संयुक्त सहविचार सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीस राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी तसेच महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या नव्या व्यवस्थेनुसार परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतील. केंद्रांवर त्यांची मुद्रित प्रत काढून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वितरण केले जाईल. जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही केंद्रांवर पथदर्शी तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येणार असून त्यानंतर राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर ही प्रणाली लागू करण्याचे नियोजन आहे.
बैठकीत ग्रामीण भागातील इंटरनेट आणि तांत्रिक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. राज्य मंडळाकडे आवश्यक तांत्रिक सुविधा आणि नियंत्रण यंत्रणा उपलब्ध असल्याने अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
‘शिक्षण संक्रमण’ मासिक पूर्णपणे डिजिटल
याशिवाय ‘शिक्षण संक्रमण’ हे राज्य मंडळाचे मासिक पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे छपाई आणि टपाल खर्चात बचत होणार असून अधिकाधिक शिक्षकांपर्यंत हे मासिक पोहोचण्यास मदत होणार आहे.
सीएसआर च्या माध्यातून विद्यार्थ्यींचे शुल्क भरणार
राज्यातील उद्योग आणि कंपन्यांच्या सीएसआर निधीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आणि मुलींचे परीक्षा शुल्क भरण्याचा उपक्रम राबविण्याची माहितीही अध्यक्ष कुलकर्णी यांनी दिली. महासंघाने या निर्णयांचे स्वागत करत राज्य मंडळाचे अभिनंदन केले.






