फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘शाळा आपल्या दारी’ आणि ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ हे महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. मार्च ते जून २०२६ या कालावधीत हे अभियान राज्यभर राबवले जाणार असून, यामागील उद्दिष्ट म्हणजे जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुवर्णकाळ मिळवून देणे हे आहे.
खाजगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेमुळे सरकारी शाळांमधील प्रवेश घटत असल्याचे लक्षात घेऊन राज्य स्तर समितीने सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, शाळांमध्ये नाविन्यपूर्ण सुविधा आणि लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ या अभियानातून गावपातळीवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जनजागृती केली जाणार आहे.
या मोहिमेसाठी विशेष गीत तयार करण्यात आले असून, त्याद्वारे शाळांमधील उपलब्ध सुविधा घराघरात पोहोचवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि पोषण आहार यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती पालकांना दिली जाणार आहे. केवळ जाहिरात न करता शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधणार आहेत. ‘शाळा आपल्या दारी’ या उपक्रमातून थेट संपर्क साधून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांचा, विशेषतः मातांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘माता-पालक मेळावे’ आयोजित केले जातील. या मेळाव्यांमधून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पालकांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले जाईल.
या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक प्रशासनाचा सहभाग. आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देणाऱ्या पालकांना प्रोत्साहन म्हणून काही ठिकाणी स्थानिक करात सवलत देण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे. याशिवाय, ‘शिक्षणाची वारी’, ‘ग्रंथदिंडी’ आणि ‘चावडी वाचन’ यांसारख्या उपक्रमांद्वारे संपूर्ण गाव शैक्षणिकदृष्ट्या जागरूक करण्याचा प्रयत्न होणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री Dada Bhuse यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि प्रगत शिक्षण मिळावे, हे शासनाचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांना ‘सेमी इंग्रजी’ आणि ‘स्मार्ट क्लास’सारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले जात आहे. ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ या अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून मराठी शाळांचे वैभव पुन्हा प्राप्त करण्याचा शासनाचा मानस आहे.






