फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत 2025 साली एकूण 179 पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीत गट ब (अराजपत्रित) आणि गट क पदांचा समावेश असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. जाहिरातीनुसार विधी सहाय्यक 3, लघुलेखक (उच्च श्रेणी) 2, लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 22, निरीक्षक 121 आणि वरिष्ठ लिपिक 31 अशी पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांना 11 सप्टेंबर 2025 पासून अर्ज करता येतील, तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे.
अंतिम दिवशी रात्री 11:55 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करताना उमेदवारांनी आपला प्रोफाइल अधिकृत वेबसाइटवर तयार अथवा अपडेट करणे बंधनकारक आहे. तसेच वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक असून अर्ज अंतिम सबमिट केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹1000, मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ₹900 निश्चित करण्यात आले आहे.
माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांना शुल्क माफ करण्यात आले असून शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे व ते परत मिळणार नाही. निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे, तर लघुलेखक पदासाठी प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात येईल. विधी सहाय्यक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी 200 गुणांची दोन तासांची परीक्षा होईल. लघुलेखक पदासाठी 120 गुणांची एक तासाची लेखी परीक्षा व 80 गुणांची प्रात्यक्षिक चाचणी असेल.
परीक्षेतील विषयांमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित तर्कशास्त्र आणि विषय-विशिष्ट ज्ञानाचा समावेश असेल. निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवारांना वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे मूळ आणि प्रती स्वरूपात सादर करावी लागतील. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा.