रोमारियो शेफर्डने टी-२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेतली(फोटो-सोशल मीडिया)
Romario Shepherd takes a hat-trick in the T20 World Cup : वेस्ट इंडिजने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. पहिल्या ग्रुप सी सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडचा ३५ धावांनी धूळ चारून विजय नोंदवला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक अष्टपैलू रोमारियो शेफर्डने महत्त्वाची भूमिका वठवली. या सामन्यात शेफर्डने हॅटट्रिकसह ५ विकेट्स घेऊन स्कॉटलंड संघाचे कंबरडे मोडले.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही दहावी हॅटट्रिक ठरली. तसेच, शेफर्ड हा पराक्रम करणारा एकूण नववा गोलंदाज आहे. रोमारियो शेफर्डने वेस्ट इंडिजच्या विजयात बॅटने नव्हे तर चेंडूने महत्त्वाची भूमिका पार पडली. एका षटकात त्याने ४ गडी माघारी पाठवले. ज्यामध्ये हॅटट्रिकचा देखील समावेश आहे. रोमारियो शेफर्ड हा टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजसाठी हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आणि एकूण नववा गोलंदाज ठरला.
टी-२० विश्वचषकात पहिली हॅटट्रिक ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने घेण्याची किमया साधली होती. २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आवृत्तीत ब्रेट लीने बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. २०२१ मध्ये आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने नेदरलँड्सविरुद्ध दुसरी हॅटट्रिक घेतली. तर २०२१ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी हॅटट्रिक घेतली होती. २०२१ च्या विश्वचषकात कागिसो रबाडाने इंग्लंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली, जी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील चौथी हॅटट्रिक ठरली होती.
That #T20WorldCup hat-trick feeling 🫶 Swipe 👈 to watch Romario Shepherd’s wickets en route to the milestone 💥 Tournament broadcast details in our bio 📺 pic.twitter.com/ELPeqBBVkq — ICC (@ICC) February 7, 2026
२०२२ च्या टी-२० विश्वचषकात, यूएईच्या कार्तिक मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. तर आयर्लंडच्या जोश लिटलने न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेण्याची किमया साधली होती. हॅटट्रिक घेणारा मयप्पन पाचवा आणि लिटल सहावा गोलंदाज ठरला होता. सतेच २०२४ च्या टी-२० विश्वचषकात तीन हॅटट्रिक घेतल्या गेल्या होत्या. पॅट कमिन्सने दोन वेळा हॅटट्रिक घेण्याची किमया साधली. त्याने बांगलादेशविरुद्ध पहिली आणि अफगाणिस्तानविरुद्ध दुसरी हॅटट्रिक चटकावली होती. कमिन्स टी-२० विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला होता.
तसेच, २०२४ मध्ये इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनने अमेरिकेविरुद्ध टी-२० विश्वचषकात नववी हॅटट्रिक घेतली होती. जॉर्डन हॅटट्रिक घेणारा आठवा गोलंदाज बनला होता. तसेच, चालू टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये रोमारियो शेफर्डने आता स्कॉटलंडविरुद्ध नववा गोलंदाज म्हणून यादीत आपले नाव पक्के केले.






