फोटो सौजन्य - Social Media
संघ लोक सेवा आयोगाची (UPSC) परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, मात्र त्यापैकी फार थोडेच निवड होऊन सिव्हिल सेवेत दाखल होतात. अशा यशस्वी अधिकाऱ्यांमध्ये नागपूरचे सुपुत्र अर्चित चंदक यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. अर्चित यांनी २०१८ च्या UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत ऑल इंडिया रँक १८४ मिळवली आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) मध्ये आपली जागा निश्चित केली.
नागपूरमध्ये जन्मलेले आणि वाढलेले अर्चित चंदक हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. २०१२ मध्ये त्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मध्ये नागपूर शहरात टॉपर ठरत आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी दिल्लीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. आयआयटीमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवले की त्यांची खरी दिशा कॉर्पोरेट नोकरी नसून देशसेवा आहे.
अर्चित यांच्या बुद्धिमत्तेची दखल घेत एका जपानी कंपनीने त्यांना ३५ लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी ऑफर केली होती. ही ऑफर कुणालाही आकर्षक वाटली असती, पण अर्चित यांनी ती नाकारली. त्यांनी ठाम निर्णय घेतला की आपले करिअर ते सिव्हिल सेवेसाठी समर्पित करतील. बी.टेक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
त्यांची पहिली पोस्टिंग भुसावल येथे बाजारपेठ पोलिस ठाण्यात ठाणेप्रमुख (SHO) म्हणून झाली. इथे काम करताना त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे जनतेचा विश्वास संपादन केला. पुढे त्यांना बढती मिळत नागपूरमध्ये पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून जबाबदारी देण्यात आली. मे २०२५ पासून ते महाराष्ट्र कॅडरमधील अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत आहेत.
प्रशासन आणि अभ्यासाबरोबरच अर्चित हे फिटनेसप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी ४२ किलोमीटरचा मुंबई मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांना शतरंजचीही विशेष आवड असून त्यांची FIDE रेटिंग १८२० इतकी आहे. त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तितकेच मजबूत अधिकारी मानले जातात. निजी आयुष्याबाबत बोलायचं झालं तर अर्चित यांनी आपली UPSC बॅचमेट असलेल्या IAS अधिकारी सौम्या शर्मा यांच्याशी विवाह केला आहे. त्यांच्या आयुष्याची वाटचाल ही केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम, स्पष्ट ध्येय आणि त्याग यामुळे कोणत्याही अडचणींवर मात करून यश संपादन करता येतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे IPS अर्चित चंदक.