कोल्हापुरात भीषण अपघात (फोटो- istockphoto)
भीषण अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी
शाहू मिल चौकात घडली घटना
कोल्हापूरमध्ये घडली हिट अँड रनची घटना
कोल्हापूर: शहरातील राजारामपुरी, शाहू मिल चौकात शनिवारी दुपारी हिट अँड रनची घटना घडली. या अपघातात कोल्हापूर मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांची वकील मुलगी अशा दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. दीपक महादेव वंसे ( रा.साईबाबा मंदिरलगत, दिलबहार तालीम चौक, कोल्हापूर), त्यांची नवविवाहित मुलगी अॅड.भाग्यश्री लक्ष्मण गवळी उर्फ वंसे (रा. कसबा बावडा, कोल्हापूर, मुळ रा. खोकुर्ले, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. तर दोन तरुण जखमी झाले. अपघातानंतर कार चालक मयुरेश योगेश पाटील (वय २०, रा. आठवी गल्ली, राजारामपूरी, कोल्हापूर) याला जमावाने चांगलाच चोप देत, कार रस्त्यावर उलटून टाकली. या अपघात प्रकरणी राजारामपूरी पोलिसांनी कार चालक मयुरेश पाटील याला रात्री उशिरा अटक केली आहे.
अपघाताची अधिक माहिती अशी की, कार चालक मयुरेश पाटील याची काही दिवसापूर्वी प्रकृत्ती बिघडल्याने, त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याला दोन दिवसापूर्वी रुग्णालयातून डिचार्ज देण्यात आला होता. तो शनिवारी दुपारी कार घेवून जात होता. यावेळी त्याने राजारामपुरी रस्त्यावर एका रिक्षा चालकाला ठोकर दिली. या अपघातानंतर त्याच्यात आणि रिक्षा चालकामध्ये वाद सुरु झाला. याचदरम्यान त्याने घटनास्थळावरुन कारसह पलायन केले. त्यामुळे रिक्षाचालकाने त्याचा पाठलाग सुरु केल्याने त्याने रिक्षा चालकाला चकवा देण्यासाठी कार भरधाव वेगाने चालवित शहरातील शाहू मिल चौकात आला. या चौकातून तो कोटीतिर्थ तलावमार्गे उद्यमनगराकडे जावू लागला.
Gujrat Crime: मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार
याचवेळी चौकालगतच्या वळणावर त्याचा कारवरील ताबा सुटल्याने, कारची समोरुन येणाऱ्या तीन दुचाकींना जोराची धडक बसली. या धडकेत तिन्ही दुचाकीवरील सर्वजण उडून रस्त्याच्याकडेला पडले. यामध्ये कोल्हापूर मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी दीपक वंसे आणि त्यांची नवविवाहित मुलगी अॅड. भाग्यश्री गवळी उर्फ वंसे या दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने या बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, तिन्ही दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघाताच्या आवाजाने चौकातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमीना तत्काळ उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर कारमध्ये अडकून राहिलेला कार चालक मयुरेश पाटील याला कारमधून बाहेर काढत नागरिकांनी त्याचा चांगलाच चोप दिला. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्याने, राजारामपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
जमावाकडून मारहाण सुरु असलेल्या कार चालक मयूरेश पाटील याची जमावाच्या तावडीतून सुटका करीत त्याला ताब्यात घेतले.
अपघात स्थळाचे दृष्य मन हेलावून टाकणारे होते. त्यानंतर पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणाचा पंचनामा करुन, मयत दीपक वंसे आणि त्यांची मुलगी अॅड. भाग्यश्री गवळी उर्फ वंसे या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयाकडे पाठिवला. या अपघाताची माहिती समजताच वंसे यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृत वंसे बाप-लेकीचे मृतदेह पाहताच केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या अपघातस्थळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी भेट दिली.






