अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६ (फोटो- ट्विटर)
महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार
महाराष्ट्र हे सध्या वेगाने विकसित होणारे राज्य
विदर्भाचा प्रदेश झपाट्याने विकसित होतोय
नागपूर: येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित अॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंटरनॅशनल बिझनेस कॉनक्लेव्हचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह तब्बल २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे याच परिषदेत गुंतवणुकीचे तीन सामंजस्य करारही पार पाडण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे सध्या वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यातल्या त्यात विदर्भाचा प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात आहेत. लॉजिस्टिक्स, एआय, सोलर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसी, जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, बांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे.
यात भर घालून सात नवीन धोरणांची घोषणा येत्या दोन-तीन महिन्यांत होणार आहे. यामध्ये टेक्सटाइल्स अँड अॅपरल, लेदर अँड फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब, एरोस्पेस अँड डीफेन्स, एमएसएमई, फार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेस, सर्क्युलर इकॉनॉमी, बायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल. या सातही धोरणांच्या निर्मितीचे काम सुरू असून येत्या तीन महिन्यांत ते जाहीर करण्यात येतील. यामुळे धोरणप्रेरित गुंतवणूक, उद्योगवाढ आणि आर्थिक विकास हेच महाराष्ट्राचं प्रमुख सूत्र ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
🤝 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari presided over the MoU signing and exchange between the Government of Maharashtra and GR Infrastructure for setting up a telecom tower manufacturing plant in Nagpur. This partnership involves a total investment of ₹200… pic.twitter.com/C21fWfs63D — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 7, 2026
सोलर मॉड्यूलच्या क्षेत्रात नागपूर क्षेत्रात येणारी गुंतवणूक ही देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल प्रोड्यूसिंग इकोसिस्टीम असून अद्यापही गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. कृषी प्रक्रियेसह अनेक निर्मितीक्षम क्षेत्रात नागपूर आणि विदर्भाची मोठ्या प्रमाणात आगेकूच सुरु आहे, अनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी येत आहेत.
“५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास…”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन
अगदी गडचिरोलीसारख्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होत असून भारताचे स्टील हब म्हणून ते पुढे येत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोलीत पोलादनिर्मितीची सर्वाधिक मोठी क्षमता उभी राहणार आहे. एवढेच नाही, तर गडचिरोलीला पर्यावरणपूरक ‘ग्रीन स्टील’ हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेनेही आम्ही ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.






