फोटो सौजन्य - Social Media
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मे 2025 मध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट फायनल, इंटरमिजिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स परीक्षांचे उर्वरित पेपर आता पुढे ढकलण्यात आले आहेत. ही माहिती ICAI ने अधिकृत पत्रकाद्वारे दिली आहे.
13 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या महत्त्वपूर्ण घोषणेमध्ये बदल करत ICAI ने सांगितले की, “देशातील तणावपूर्ण आणि असुरक्षित परिस्थिती लक्षात घेता 9 मे 2025 ते 14 मे 2025 दरम्यान होणारे उर्वरित पेपर्स (CA Final, Intermediate, आणि International Taxation – Assessment Test INTT AT) पुढे ढकलण्यात येत आहेत.”
नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही ICAI ने स्पष्ट केले आहे. परीक्षार्थ्यांना ICAI च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.icai.org) संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ही संपूर्ण परिस्थिती 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झाली. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पूंछ, मेंधार आणि राजौरी अशा सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या भीषण गोळीबारात 16 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
ही परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून ICAI ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे काहीशी चिंता निर्माण झाली असली, तरी ICAI ने दिलेल्या आश्वासनानुसार नवीन वेळापत्रक लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ICAI च्या या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवावे. उमेदवारांना अधिक माहिती या संकेतस्थळावरून कळवण्यात येणार आहे.