फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2024-25 हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात असून राज्यातील बहुतांश शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू झाली आहे. अनेक शाळांमध्ये तोंडी परीक्षा घेतल्या जात आहेत, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही तयारीत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत वार्षिक परीक्षा म्हणजेच फायनल परीक्षा कधी होणार याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
यंदा राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. याआधी या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतल्या जात होत्या, मात्र यावर्षी सर्वच शाळांमध्ये परीक्षा एकाच कालावधीत पार पडणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याबाबत आदेश जारी केले असून त्यानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, कारण शिक्षणाधिकारी किंवा ‘डायट’ (DIET) मार्फत कधीही त्यांची तपासणी केली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा 5 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी शाळा त्यांच्या सोयीनुसार परीक्षा घेत असत, त्यामुळे काही शाळांमध्ये परीक्षांचा कालावधी वेगवेगळा असे. मात्र यंदा सर्वच शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने विद्यार्थी 25 एप्रिलपर्यंत शाळेत उपस्थित राहतील. परीक्षेनंतर थेट उन्हाळी सुट्टी सुरू होईल, मात्र मुख्याध्यापकांसाठी निकाल प्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.
यंदा निकाल 1 मे रोजी घोषित केला जाणार आहे. निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षक आणि शाळांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे निकाल 1 मे पर्यंत तयार करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तातडीने करावे लागेल. त्यामुळे शिक्षकांसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या नव्या प्रणालीमुळे राज्यभरातील शाळांमध्ये एकसमान परीक्षा प्रणाली लागू होईल. विद्यार्थ्यांना याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. मात्र, परीक्षा एकाच कालावधीत झाल्यामुळे शाळांना निकाल प्रक्रियेत वेग वाढवावी लागणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांनी वेळापत्रकानुसार तयारी करणे आवश्यक आहे.