भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन (फोटो सौजन्य-Gemini)
धाराशिव : जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. आतापर्यंत विविध परीक्षा केंद्रांवर टाकलेल्या अचानक छाप्यांत एकूण १५ विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणे नोंदविण्यात आली असून ६ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय दोन पर्यवेक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान नळदुर्ग येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे छापील साहित्य आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकाने संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध तत्काळ कॉपीप्रकरण नोंदविले. जप्त साहित्याचा पंचनामा करण्यात आला. त्याच दिवशी जळकोट येथील इंदिरा काळे कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर दोन परीक्षकांच्या वर्गात विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवरच उत्तरे लिहिल्याचे उघड झाले. या गंभीर प्रकाराबाबत दोन पर्यवेक्षकांविरुद्ध एफआयआर नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संस्थेला दोघांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१८ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व बोर्डाच्या भरारी पथकांनी एकाच दिवशी अनेक केंद्रांवर छापे टाकले. आरपी कॉलेज, धाराशिव येथे रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान २ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. डीपीएम कॉलेज, कळंब येथे १ विद्यार्थी गैरप्रकार करताना सापडला. सलगरा दिवटी येथील जिल्हा परिषद प्रशाला परीक्षा केंद्रावर तब्बल ९ विद्यार्थी कॉपीप्रकरणात आढळले. यामुळे १८ फेब्रुवारी रोजीच एकूण १२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
सलगरा दिवटी येथील प्रकरणात पर्यवेक्षणात कसूर व दुर्लक्ष केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे ३ शिक्षक तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ३ खाजगी संस्थांच्या शिक्षकांवर संस्थेमार्फत निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जळकोट प्रकरणात आधीच २ पर्यवेक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कॉपीबहाद्दरांविरुद्ध प्रशासनाने केलेल्या एकूण कारवाईचा आढावा घेतला असता विद्यार्थ्यांवरील कॉपीप्रकरणे १५ असून एफआयआर दाखल केलेल्या पर्यवेक्षकांची संख्या २ आहे. तर जिल्हा परिषद शाळेतील निलंबनाची कारवाई करण्यात आलेले शिक्षक ३ असून खाजगी संस्थेतील निलंबनाचे आदेश देण्यात आलेले शिक्षक ३ आहेत.
गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित पेपर रद्द, पुढील परीक्षांवर बंदी आदी शिक्षा होऊ शकतात. तसेच गैरप्रकारास मदत करणाऱ्या किंवा प्रतिबंध न करणाऱ्या पर्यवेक्षक व केंद्र संचालकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे. परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्याचा प्रशासनाचा निर्धार कायम असून पुढील पेपरदरम्यानही भरारी पथकांची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Bhiwandi Mayor Election: भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान






