फोटो सौजन्य - Social Media
बंदरावर नोकरी करण्याची इच्छा असूनही अनुभव नसल्यामुळे संधी मिळत नाहीये? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटीने ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि कंप्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 10 नोव्हेंबर 2025 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे, कारण या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या भरतीद्वारे बंदर व्यवस्थापन आणि संगणक संचालन क्षेत्रात नवोदितांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पात्रतेनुसार, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E., B.Com., B.A., B.Sc. किंवा BCA पदवी घेतलेली असावी, तर COPA अप्रेंटिस साठी 10वी उत्तीर्ण आणि COPA ट्रेड सर्टिफिकेट आवश्यक आहे. ज्यांनी यापूर्वी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतले आहे, ते या कार्यक्रमासाठी पात्र राहणार नाहीत. वयोमर्यादेनुसार, अर्जदाराचे वय किमान 14 वर्षे पूर्ण असावे, मात्र जास्तीत जास्त वयोमर्यादेची अट नाही.
14 ते 18 वयोगटातील उमेदवारांसाठी पालक किंवा संरक्षकाची स्वाक्षरी आवश्यक असेल. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असल्याने उमेदवारांनी मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत भरती अधिसूचनेतील अर्ज नमुना डाउनलोड करून त्यात सर्व माहिती जसे की नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, पत्ता, मोबाईल क्रमांक, पॅन आणि आधार तपशील इत्यादी नीट भरावेत.
अर्जासोबत 10वी, 12वी किंवा पदवीच्या गुणपत्रिका, UTR रिसिप्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट, पॅन आणि आधार कार्ड तसेच जात, विवाह किंवा अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास) स्वप्रमाणित करून जोडावेत. अर्जदारांना ₹100 शुल्क NEFT द्वारे अधिकृत बँक खात्यात भरावे लागेल. अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा नमुना पाहण्यासाठी मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ही अप्रेंटिसशिप योजना तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार असून, ती भविष्यातील करिअरला बळकटी देणारी ठरेल.