PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; 'हे' आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!
PM Narendra Modi security India: वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमित कुमार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. पंतप्रधान आणि इतर काही अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’मध्ये (SPG) त्यांची ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस अमित कुमार हे १९९४ च्या बॅचचे बिहार कॅडरचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळ ‘सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स’मध्ये (CRPF) अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ते सीआरपीएफमध्ये स्पेशल डायरेक्टर जनरल (DG) सारख्या वरिष्ठ पदावर कार्यरत राहिले आहेत. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षा, नक्षलविरोधी मोहिमा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) संचालनाचा दांडगा अनुभव आहे.
आयपीएस अमित कुमार हे एसपीजीचे पुढील संचालक होणार आहेत. या दलाचे विद्यमान संचालक आलोक शर्मा यांचा वाढीव कार्यकाळ ३१ मार्च २०२७ रोजी संपणार असून पुढील सुत्रे अमित कुमार यांच्या हाती येतील. आलोक शर्मा हे नोव्हेंबर २०२३ पासून एसपीजी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाल्यास यांनी एम.टेक (M.Tech) पूर्ण केले आहे. एसपीजीमध्ये ‘ओएसडी’ म्हणून झालेली त्यांची नियुक्ती ही त्यांच्या सुरक्षा क्षेत्रातील आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
‘एसपीजी’चे पूर्ण नाव ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (Special Protection Group) असे आहे. ही भारतातील एक विशेष सुरक्षा यंत्रणा असून, देशाचे पंतप्रधान आणि इतर काही अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIPs) सुरक्षेची जबाबदारी या दलावर असते. या दलाची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली होती. सध्याच्या नियमांनुसार, एसपीजी प्रामुख्याने भारताचे विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असते.
एसपीजी दलातील अधिकारी आणि जवानांची नियुक्ती ही प्रतिनियुक्तीवर केली जाते. या दलातील जवानांची निवड निमलष्करी दले (Paramilitary Forces) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) इत्यादींमधून केली जाते. तर, अधिकारी पदांवरील नियुक्ती ही भारतीय पोलीस सेवेतून (IPS) प्रतिनियुक्तीद्वारे केली जाते.






