फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MPSC Exam Postponed 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयोगाने एक अधिकृत पत्र जारी करून काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यानुसार, ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५’ च्या उत्तर पत्रिकांची (कॉप्यांची) पुन्हा तपासणी (पुनर्मूल्यांकन) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ सह इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालानंतर आणि गुणांच्या मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी संघटनांनी आणि विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. आयोगाकडे उत्तर पत्रिकांच्या तपासणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या या हरकती आणि तक्रारी गांभीर्याने घेत, आयोगाने २०२५ च्या मुख्य परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया काहीशी लांबण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रभरातल्या युवकांची जी मागणी आम्ही राज्यपाल महोदयांसमोर ठेवली होती, ती मान्य करुन राज्य सेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार! आता ह्याच निर्णयाप्रमाणे राज्य सेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तत्काळ घेतला जाईल अशी आशा करतो. pic.twitter.com/7cWC2PBTrP — Aaditya Thackeray (@AUThackeray) September 28, 2026
राज्यातील परीक्षांच्या संपूर्ण पॅटर्न आणि व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती राज्यभरातील विद्यार्थ्यांशी चर्चा करून लवकरच परीक्षा प्रणाली सुधारण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी सादर करणार आहे. दरम्यान, २०२५ च्या परीक्षेचा वाद आणि नवीन समितीच्या अहवालामुळे विद्यार्थी, पालक आणि नेत्यांनी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली होती.
याच गोष्टी लक्षात घेऊन आयोगाने ३ ऑक्टोबर २०२६ पासून होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र सिव्हिल इंजिनीअरिंग मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र ग्रुप-बी मुख्य परीक्षा-२०२६ तूर्तास पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाईल.
MPSC च्या या निर्णयावर शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत करत यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आभार मानले आहेत. तसेच, लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.






