
mpsc paper leak
MPSC Protest 2026: गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि कारभारातील अनागोंदीच्या विरोधात आज (दि. ८ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमधील क्रांतीचौक येथे विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांची मोठी एकजूट पाहायला मिळाली असून, MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरोधात विद्यार्थ्यांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
तलाठी भरती, FDA परीक्षा भरती आणि सरळसेवेच्या विविध परीक्षा MPSC च्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याविरोधात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि विविध क्लासेसच्या संयुक्त विद्यमाने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या आंदोलनाची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवली होती.
या आंदोलनात संदीप इंगळे, कृष्णा कदम, ओम भगुरे, सचिन कीर्तीकर आणि संदीप गायकवाड या विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे, या आंदोलनात कोणतीही राजकीय व्यक्ती सहभागी झालेली नव्हती, तर यात केवळ सर्वसामान्य कुटुंबातील स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि याचे व्यापक स्वरूप संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी MPSC चॅलेंजर्सचे संचालक उत्तम गोरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. सोशल मीडियावर या आंदोलनावरून प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, “राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे असे विराट मोर्चे निघत आहेत.
काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत असून विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावं आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व… pic.twitter.com/xYrLaln9wC — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2026
आता हा आक्रोश पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो प्रत्येक जिल्ह्यात दिसेल, हे मी आधीच सांगितले होते आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ते दिसून आले.” तसेच, “आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावे आणि पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी केली. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास हा रोष आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.