
NEET
NEET UG Re-Exam: १८ जून २०२६ रोजी नीट (NEET UG) परीक्षा पुन्हा घेण्यात आली, तेव्हा पेपर फुटीच्या जुन्या वादांमुळे यंत्रणा अतिशय कडक असेल असा दावा ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) केला होता. मात्र, परीक्षेच्या दिवशीच बिहारपासून ते हैदराबाद आणि जयपूरमधील गैरप्रकारांपर्यंत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या.
या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातून आली. येथे दुसऱ्यांच्या जागी परीक्षा देणाऱ्या ‘सॉल्वर गँग’ला पोलिसांनी पकडले. धक्कादायक बाब म्हणजे हे सॉल्वर देशातील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे एमबीबीएसचे (MBBS) विद्यार्थी होते. या नेटवर्कचा मास्टरमाइंड ‘रविशंकर ऊर्फ सम्राट’ हा स्वतः नालंदा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणात एम्स रायबरेली, बीएचयू आणि दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह एकूण ३० जणांना अटक करण्यात आली आहे.
हैदराबाद: रामगुडा येथील एका सरकारी शाळेत एका विद्यार्थ्याने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सकाळी ७ वाजता शौचालयाच्या फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवला होता. परीक्षा सुरू असताना तो कॉपी करण्यासाठी गेला असता पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.
जयपूर: हिमांशी नावाच्या विद्यार्थिनीने कपड्यांमध्ये मोबाईल लपवून परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवला. मेटल डिटेक्टचा अलार्म वाजल्यावर तिने हुकचे कारण सांगून सुरक्षारक्षकांना चकवा दिला. परीक्षा संपण्याच्या १५ मिनिटे आधी मोबाईलने पेपरचा फोटो काढताना ती पकडली गेली.
इंदूर : अक्षय मालवीय नावाच्या तरुणाने चॅटजीपीटीच्या (ChatGPT) मदतीने बनावट पेपर तयार केला आणि ‘नीटचा ओरिजिनल पेपर’ असल्याचे सांगून इन्स्टाग्रामवर १०० ते २०० रुपयांना विकला. कोटा येथील विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर इंदूर पोलिसांनी त्याला अटक केली.
यावेळच्या एनटीएच्या ड्रेस कोड मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हिजाबबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने अनेक केंद्रांवर मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब उतरवण्यास सांगण्यात आले. केरळ उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तिथल्या केंद्रांवर परवानगी मिळाली, मात्र इतर ठिकाणी विद्यार्थिनींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
MBBS Full Form History: ‘MBBS’ या डॉक्टर पदवीचा रंजक इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर..
सर्व गैरप्रकार उघड होऊनही ‘एनटीए’ने परीक्षा शांततेत पार पडल्याचा आणि पेपर फुटीच्या बातम्या केवळ अफवा असल्याचा जुनाच राग आळवला. या परीक्षेने दोन गोष्टी सिद्ध केल्या – एकतर सरकारने सुरक्षा वाढवली होती, परंतु दुसरीकडे बायोमेट्रिक, सीसीटीव्ही आणि जॅमर्स असूनही यंत्रणेला चकवा देण्याचे नवनवे मार्ग शोधले जात आहेत. त्यामुळे कोणतीही यंत्रणा १००% सुरक्षित असू शकते का? हाच मोठा प्रश्न आहे.