फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG Re-Exam 2026 Security Measures: नीट यूजी फेरपरीक्षा आज म्हणजेच २१ जून रोजी आयोजित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एनटीएने (NTA) आपली तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा निष्पक्ष आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी एजन्सीने देशभरात अनेक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत.
आज होणारी ही परीक्षा देशातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी ५,४४० केंद्रे तयार करण्यात आली असून, यामध्ये २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
परीक्षा केंद्र आणि वर्गांवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूण १.३८ लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय, राज्य आणि मंत्रालय पातळीवर देखरेख ठेवली जात आहे. तसेच आज परीक्षा वर्गांच्या लाइव्ह फुटेजवर सतत लक्ष ठेवले जाणार असून, यासोबतच एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित सिस्टम देखील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करेल; जेणेकरून कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून कारवाई करता येईल. परीक्षा केंद्रांवर सुमारे ६,७०० ऑब्झर्व्हर्स (पर्यवेक्षक) तैनात करण्यात आले आहेत, तर १०० हून अधिक व्हर्च्युअल ऑब्झर्व्हर्स केंद्रीय पातळीवरून लाइव्ह मॉनिटरिंग करणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी देशभरात ५१,००० हून अधिक जॅमर्स बसवण्यात आले आहेत. NTA नुसार, जॅमर्सच्या मदतीने परीक्षा केंद्रांवर मोबाईल नेटवर्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाईल, ज्यामुळे परीक्षेची गोपनीयता कायम राहील.
विद्यार्थ्यांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी यंदा बायोमेट्रिक पडताळणी (वेरिफिकेशन) व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. सुमारे ४८,००० हून अधिक कर्मचारी बायोमेट्रिक पडताळणीच्या कामात लावण्यात आले आहेत. यासोबतच फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळखण्याची) तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. केंद्रांवर प्रवेश देण्यापूर्वी उमेदवारांची कसून तपासणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे ३८,००० फ्रिस्किंग स्टाफ (तपासणी कर्मचारी) तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर ४० ते ५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
International Yoga Day: योग दिनासाठी २१ जून हीच तारीख का निवडली? जाणून घ्या यामागचे रंजक कारण..
देशभरातील शेकडो सेंटर्सवरून ओएमआर शीट्स गोळा करण्याची जबाबदारी टपाल विभाग सांभाळणार आहे. NTA ने परीक्षेपूर्वी देशव्यापी मॉक ड्रिल देखील आयोजित केले होते, ज्यामध्ये सीसीटीव्ही, जॅमर्स, बायोमेट्रिक सिस्टम, तपासणी प्रक्रिया आणि परीक्षा साहित्याची उपलब्धता यांची पडताळणी करण्यात आली.






