फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG Re-Exam 2026 Guidelines: नीट यूजी परीक्षा आज २१ जून रोजी देशभरात आयोजित केली जात आहे. या परीक्षेत २२ लाखांहून अधिक उमेदवार सहभागी होणार आहेत. परीक्षा दुपारी २:०० वाजता सुरू होईल, परंतु उमेदवारांना त्याआधी बऱ्याच वेळ आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. एनटीएने (NTA) यंदा सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. अशा परिस्थितीत छोटीसा निष्काळजीपणाही उमेदवारांना अडचणीत आणू शकतो. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि परीक्षेशी संबंधित नियम एकदा नीट तपासून घेणे आवश्यक आहे.
NTA नुसार, परीक्षा केंद्रांवर प्रवेश सकाळी ११:०० वाजल्यापासून सुरू होईल आणि दुपारी १:३० वाजेपर्यंतच प्रवेश दिला जाईल. यानंतर कोणत्याही व्यक्तीला केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा दुपारी २:०० ते संध्याकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल. तर दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त वेळ दिला जाईल.
परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी प्रवेशपत्र (एडमिट कार्ड) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. NTA ने स्पष्ट केले आहे की, केवळ २१ जूनच्या परीक्षेसाठी जारी केलेले नवीन प्रवेशपत्रच वैध असेल; जुन्या प्रवेशपत्राच्या आधारे प्रवेश मिळणार नाही. याशिवाय, उमेदवारांना ओळखपत्रासाठी मतदार ओळखपत्र (वोटर आयडी), पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा इतर अधिकृत फोटो ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. तसेच, पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. पीडब्ल्यूबीडी (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना संबंधित प्रमाणपत्रही सोबत आणावे लागेल.
International Yoga Day: योग दिनासाठी २१ जून हीच तारीख का निवडली? जाणून घ्या यामागचे रंजक कारण..
उमेदवार केवळ पारदर्शक पाण्याची बाटली, आवश्यक कागदपत्रे आणि पारदर्शक फोल्डर किंवा पाऊच सोबत घेऊन जाऊ शकतात. याव्यतिरिक्त कोणत्याही अतिरिक्त वस्तूंना परीक्षा केंद्रात नेण्याची परवानगी नसेल. तसेच उमेदवार दागिने, धातूचे अलंकार, मोठ्या हेअर क्लिप्स यांनाही आत घेऊन जाण्यास परवानगी नाही.
NTA ने यंदा ड्रेस कोडबाबतही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उमेदवारांनी हलके आणि साधे कपडे परिधान करून यावे. मुलांसाठी हाफ स्लीव्हज टी-शर्ट किंवा शर्ट आणि साधी पँट योग्य मानली गेली आहे. तर मुली साधी कुर्ती, सलवार सूट किंवा हलके कपडे घालू शकतात. पादत्राणांमध्ये केवळ चप्पल किंवा कमी हीलच्या सँडल्स घालण्याची परवानगी असेल; बंद बूट (शूज) घालण्यावर बंदी आहे.
धार्मिक किंवा पारंपारिक पोषाख परिधान करून येणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागेल, त्यामुळे त्यांनी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.






