फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG 2026 Re-Exam Frisking Controversy: री-नीट २०२६ परीक्षेदरम्यान पश्चिम बंगालमधील मालदा येथील एका परीक्षा केंद्रावर झालेल्या तपासणीवरून मोठा विवाद निर्माण झाला आहे. ऋषिका पाल या विद्यार्थिनीने सोशल मीडियावर दावा केला आहे की, परीक्षा केंद्रात सुरक्षा तपासणीदरम्यान तिला विचारण्यात आले की, ‘तुम्हाला पिरीयड्स चालू आहेत का?’. विद्यार्थिनीच्या सांगण्यानुसार, तिने ‘हो’ म्हटल्यानंतर तिला सॅनिटरी पॅडची तपासणी करण्यासाठी कपडे खाली करण्यास सांगण्यात आले. तिने हा अनुभव अत्यंत अपमानकारक आणि मानसिक छळ करणारा असल्याचे म्हटले आहे.सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऋषिका पालच्या पोस्टखाली शेकडो कमेंट्स आल्या आहेत, ज्यामध्ये अनेक विद्यार्थिनींनी असाच दावा केला आहे की त्यांनाही अशाच प्रकारच्या तपासणीला सामोरे जावे लागले होते. काही विद्यार्थिनींनी आरोप केला की, सुरक्षा तपासणीच्या नावाखाली त्यांच्या खाजगी भागांना स्पर्श करण्यात आला, तर काहींनी सांगितले की त्यांना ब्रा किंवा इतर कपड्यांच्या तपासणीसाठी अत्यंत असहज परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक उमेदवारांनी असा दावा केला की त्यांनाही पिरीयड्सबद्दल प्रश्न विचारले गेले होते. मात्र, काही विद्यार्थिनींनी असेही सांगितले की त्यांच्या परीक्षा केंद्रांवर तपासणी अत्यंत सामान्य आणि आदरयुक्त पद्धतीने पार पडली.
सोशल मीडियावर समोर आलेल्या अनुभवांनी या प्रकरणाला एका विद्यार्थिनीच्या तक्रारीपेक्षा खूप मोठे बनवले आहे. अनेक उमेदवारांनी दावा केला की, त्यांना नीट (NEET), री-नीट, सीयूईटी (CUET) आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांदरम्यानही अशाच प्रकारच्या असहज तपासणीचा सामोरे जावे लागले. अर्थात, सर्वच केंद्रांवर असे घडले नाही. याच कारणामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, जर काही परीक्षा केंद्रे आदरयुक्त पद्धतीने सुरक्षा तपासणी करू शकतात, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अशा गैरसोयीला आणि अपमानाला का सामोरे जावे लागले?
CA Intermediate Result: सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर; ‘या’ सोप्या स्टेप्सने पाहा स्कोअरकार्ड
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या ठीक आधी अपमान, असहजता किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप यांसारखा अनुभव येतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर होऊ शकतो. मानसशास्त्राशी संबंधित संशोधनानुसार, अशा परिस्थितीमुळे ताणतणाव, घबराट, लक्ष विचलित होणे आणि आत्मविश्वास कमी होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सुरक्षा तपासणीसाठी स्पष्ट आणि एकसमान मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जावीत, अशी विद्यार्थिनींची मागणी आहे. तसेच, अशी व्यवस्था असावी, ज्यामध्ये परीक्षेची सुरक्षाही कायम राहील आणि कोणत्याही उमेदवाराची प्रतिष्ठा, गोपनीयता आणि मानसिक स्वास्थ्य प्रभावित होणार नाही. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय बनले असून, परीक्षा केंद्रांवरील फ्रिस्किंगच्या पद्धतींची पुनरावृत्ती किंवा पुनरावलोकन करण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे.






