फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Noida International University: ग्रेटर नोएडा येथील नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (NIU) ‘टाइम्स हायर एज्युकेशन’ (THE) इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाचे शाश्वत विकास, सामाजिक जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जागतिक सहकार्य या क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश आहे. टाइम्स हायर एज्युकेशनचे हे प्रतिष्ठित मानांकन संयुक्त राष्ट्रांच्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ (SDGs) म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यातील जागतिक विद्यापीठांच्या योगदानाच्या आधारे जाहीर केले जाते.
या यशामुळे विद्यापीठाला जागतिक मंचावर नवी ओळख मिळाली असून, शिक्षणासोबतच सामाजिक विकासाप्रती असलेली त्यांची बांधिलकी अधिक घट्ट झाली आहे.
SDG 12 : या अंतर्गत विद्यापीठाला ४०१-६०० दरम्यान जागतिक रँक मिळाली आहे. संसाधनांचा योग्य वापर, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार संस्थात्मक कार्यपद्धतीसाठी हे मानांकन मिळाले आहे.
SDG 5 : यामध्ये ६०१-८०० दरम्यान जागतिक रँक मिळाली आहे. कॅम्पसमध्ये महिलांना समान संधी देणे, नेतृत्व व संशोधनात त्यांचा सहभाग वाढवणे आणि सर्वसमावेशक वातावरण तयार केल्याबद्दल हा बहुमान मिळाला आहे.
SDG 3 : यामध्ये विद्यापीठाने ८०१-१००० दरम्यान जागतिक रँक मिळवली आहे. हे मानांकन आरोग्य शिक्षण, वैद्यकीय संशोधन आणि सामुदायिक आरोग्य सेवांमधील योगदान दर्शवते.
समग्र (Overall) ‘THE’ इम्पॅक्ट रँकिंग २०२६ मध्ये विद्यापीठाला १००१-१५०० दरम्यान जागतिक रँक मिळाली आहे. याच श्रेणीत SDG 17 अंतर्गत देखील १००१-१५०० ची जागतिक रँक मिळाली आहे. हे यश उद्योग क्षेत्र, सरकार, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत असलेल्या विद्यापीठाच्या मजबूत भागीदारीचे प्रतीक आहे.
उत्तम शिक्षण केवळ वर्गापुरते मर्यादित नसून समाज, उद्योग आणि जागतिक संस्थांसोबत मिळून काम केल्याने विद्यार्थ्यांना व्यापक संधी मिळतात, या विचारानेच विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जात आहे.
या यशाबद्दल बोलताना विद्यापीठाचे चेअरमन डॉ. देवेश कुमार सिंह म्हणाले की, “हा सन्मान संपूर्ण विद्यापीठ कुटुंबासाठी अभिमानास्पद आहे. संस्थेचा उद्देश केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे नाही, तर समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदार नागरिक तयार करणे हा आहे.”






