फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Reality of Canada Education & Jobs: शिक्षणाचा विचार केला तर कॅनडा नेहमीच भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीमध्ये राहिला आहे. सध्या तेथे ४ लाखांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बॅचलर्स, मास्टर्स, पीएचडी आणि डिप्लोमा यांसारखे अनेक कोर्सेस उपलब्ध असण्यासोबतच, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथे काम करण्याची संधीही मिळते. मात्र, गेल्या काही काळापासून कॅनडात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
अशा परिस्थितीत, कॅनडाची पदवी खरोखरच विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम बनवते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच प्रश्नाचे उत्तर कॅनडामध्ये शिक्षण घेतलेल्या सार्थक या भारतीय विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवावरून दिले आहे.
कॅनडामध्ये शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिट’ (PGWP) अंतर्गत काम करण्याची संधी मिळते. यासाठी विद्यार्थ्याचा कोर्स मान्यताप्राप्त डीएलआयमधून किमान ८ महिन्यांचा असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ‘CLB 7’ आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘CLB 5’ या पातळीचा भाषा स्कोअर (Language Score) अनिवार्य आहे.
कोर्स पूर्ण झाल्याचे अधिकृत पत्र मिळाल्यापासून १८० दिवसांच्या आत PGWP साठी अर्ज करावा लागतो. ८ महिने ते २ वर्षांपर्यंतच्या कोर्ससाठी तितक्याच कालावधीचे वर्क परमिट मिळते, तर मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल ३ वर्षांचे PGWP मिळू शकते. या परमिटच्या आधारे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात नोकरी करू शकतात.
सार्थक ऑगस्ट २०२३ मध्ये कॅनडाला गेला होता. त्याने आधी ओंटारियो येथे बिझनेस मॅनेजमेंट आणि नंतर कोनेस्टोगा कॉलेजमधून ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतले. सध्या तो एका कंपनीत सिझनल टीम मेंबर म्हणून काम करत आहे.
त्याच्या अनुभवानुसार, भारत आणि कॅनडामधील शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठा फरक आहे. भारतात शिक्षण अधिक पद्धतशीर आणि शिक्षकांवर केंद्रित असते, जिथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिकवले जाते. याउलट, कॅनडामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः रिसर्च करणे, विषय समजून घेणे आणि क्लासरूमच्या बाहेरही शिकण्यासाठी पुढाकार घेतात.
सार्थकचे असे मत आहे की, जर एखादा विद्यार्थी केवळ परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करत असेल, तर त्याला कॅनडाच्या शिक्षण पद्धतीचा पूर्ण फायदा घेता येणार नाही. परंतु, जे विद्यार्थी नवीन कौशल्ये (Skills) शिकण्यास, विषय सखोल समजून घेण्यास आणि स्वतः मेहनत घेण्यास तयार असतात, त्यांना येथील प्राध्यापकांचे पूर्ण सहकार्य लाभते.
कॅनडामधील बहुतांश कोर्सेस हे इंडस्ट्रीच्या गरजांनुसार डिझाईन केलेले असतात, पण यश त्याच विद्यार्थ्याला मिळते जो अभ्यासासोबतच आपल्या कौशल्यांवर आणि अनुभवावर सातत्याने काम करतो.






