
nta
NTA Structure Reforms: पेपर लीकच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार एनटीए (NTA) बाबत ॲक्शन मोडमध्ये आले आहे. सरकार एनटीएमध्ये मोठे बदल करण्याबरोबरच पुढील एका महिन्यात या संपूर्ण रचनेची पुनर्रचना करण्याची योजना आखत आहे. अहवालांनुसार, उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे हे बदल केले जात आहेत, जेणेकरून परीक्षा प्रणाली पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवता येईल. या बदलांमधे आता एनटीएमध्ये सायबर सुरक्षा तपासणी आणि सायकोमेट्रिक्स यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील केली जाईल.
पेपर लीक आणि या सर्व प्रकरणांमुळे आता एनटीएची तुलना UGC, सीबीएसई आणि यूपीएससी या परीक्षा एजन्सींशी देखील केली जात आहे. अशा परिस्थितीत, एनटीएची संपूर्ण यंत्रणा कशी काम करते आणि UGC, सीबीएसई आणि यूपीएससीच्या व्यवस्थेपेक्षा ती कशी वेगळी आहे, हे आपण आज पाहणार आहोत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची स्थापना २०१७ मध्ये केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून केली होती. याची नोंदणी ‘सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६०’ अंतर्गत करण्यात आली असून ती ‘आरटीआय’ (RTI) कायद्याच्या कक्षेतही येते. देशातील प्रमुख प्रवेश परीक्षांचे आयोजन एका व्यावसायिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित प्रणालीद्वारे करणे हा एनटीए स्थापन करण्यामागचा उद्देश होता. यापूर्वी वेगवेगळ्या संस्था आपापल्या परीक्षा घ्यायच्या, ज्यामुळे परीक्षा प्रणालीमध्ये एकरुपतेचा अभाव असल्याचे मानले जात होते.
सध्या एनटीए देशातील अनेक प्रमुख प्रवेश परीक्षा आयोजित करते. यामध्ये JEE Main, NEET UG, CUET UG, CUET PG, UGC NET, CSIR UGC नेट, CMAT, GPAT आणि हॉटेल मॅनेजमेंटसह इतर प्रवेश परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो विद्यार्थी देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये प्रवेश घेतात.
एनटीएचे काम केवळ परीक्षा घेणे एवढेच असते, असे अनेकदा मानले जाते; परंतु एजन्सीची जबाबदारी यापेक्षा खूप मोठी आणि व्यापक आहे. परीक्षा केंद्रांची निवड, प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया, तांत्रिक व्यवस्था, परीक्षा संचालन, डेटा व्यवस्थापन, निकाल जाहीर करणे आणि परीक्षा प्रणाली सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे ही देखील एनटीएच्या जबाबदारीचा मोठा भाग आहे. याशिवाय, परीक्षा केंद्रांची निवड आधीपासून मंजूर असलेल्या सरकारी शाळा, सीबीएसईशी जोडलेल्या संस्था आणि गरजेनुसार AICTE मान्यताप्राप्त कॉलेजच्या यादीतून केली जाते. दरवर्षी परीक्षा केंद्रांच्या संमतीची आणि मानकांची पुन्हा समीक्षा देखील केली जाते.
एनटीए स्थापन होण्यापूर्वी मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या नॅशनल ॲडमिशन परीक्षा मुख्यत्वे सीबीएसई (CBSE) आयोजित करत असे. दुसरीकडे, यूजीसी (UGC) ही संस्था ‘यूजीसी नेट’ सारख्या परीक्षांशी संबंधित नियम आणि पात्रता ठरवत असे. एनटीएची स्थापना झाल्यानंतर या जबाबदाऱ्या वेगळ्या करण्यात आल्या. आता यूजीसी केवळ उच्च शिक्षणाशी संबंधित नियम आणि पात्रता ठरवते, तर परीक्षा पार पाडण्याची संपूर्ण तांत्रिक आणि प्रशासकीय जबाबदारी एनटीकडे आहे.
तसेच, सीबीएसई आता मुख्यत्वे शालेय शिक्षण आणि बोर्ड परीक्षांवर लक्ष केंद्रित करते. एनटीए स्थापन झाल्यानंतर अनेक परीक्षा संगणक आधारित करण्यात आल्या. याशिवाय अर्ज करणे, प्रवेशपत्र आणि निकाल जाहीर करणे यांसारख्या बहुतांश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. एनटीए येण्यापूर्वी यातील अनेक प्रक्रिया बहुतांश ऑफलाईन पद्धतीने होत असत.