UPSC परीक्षेतील बोगसगिरीवर प्रियंका गांधी संतापल्या; ...प्रश्न विचारत केंद्र सरकारला सुनावले खडे बोल!
गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बोगस कागदपत्रांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने तुमची आयएएसची निवड का रद्द करु नये? सवाल देखील अशी नोटीसच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. त्यामुळे आता चक्क केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात युपीएससी परीक्षेतही बोगसगिरी पुढे आली आहे. परिणामी, याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरले आहे.
काय म्हटलंय प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये?
खुद्द केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर ट्विट करत म्हटले आहे की, “मी स्वत: विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेताना पाहिले आहे. परिणामी, देशाच्या सर्वोच्च नागरी परीक्षेतील घोटाळ्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. विद्यार्थ्यांची मेहनत पाहता या परीक्षेच्या प्रक्रियेतील एकही बोगसगिरी अनेक प्रश्न उपस्थित करते.”
पूजा खेडकर यांच्या बोगसगिरीचे प्रकरण लाखो युवकांचे स्वप्न आणि त्यांच्या विश्वासावर मोठा आघात करते. त्यामुळेच जनता आणि युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, असेही प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राजकीय हस्तक्षेपाने उच्च पदावर नियुक्त झालेले लोकच यास जबाबदार आहेत? जर असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी? असाही सवालही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे.
UPSC देश की सबसे नामी परीक्षा है और उससे निकले लोग शासन व्यवस्था के सबसे महत्वपूर्ण स्तम्भ होते हैं। देश के करोड़ों लोगों का भरोसा और हमारे रोजमर्रा के शासन-प्रशासन का कामकाज इस संस्था की पेशेवर प्रणाली से जुड़ा है।
मैंने खुद देखा है कि इस परीक्षा के लिए युवा कितनी मेहनत, आँखों…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 20, 2024
तसेच नकली प्रमाणपत्रामुळे एससी, एसटी, ओबीसी, विकलांग व ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना मिळणाऱ्या संधीवर बाधा येते. त्यामुळे हे प्रमाणपत्र तपासणी करणारी एखादी संस्था विकसित केली जाईल का? असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी नीट परीक्षा आणि युजीसी नेट परीक्षांचा असाचा सावळा-गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.