बँक परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. देशातील आघाडीची सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया यासह अन्य बँकांमध्ये अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी या बँकांकडून अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून, त्यासाठीची अर्जप्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक बँकेची संबंधित पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही वेगवेगळी आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण बँकांच्या जाहिरातींनुसार पदासाठीची पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अन्य तपशील याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख?
आयबीपीएसने ग्रामीण भागातील बँकांसाठी 9 हजाराहून अधिक पदांसाठी हे अर्ज मागवले आहेत. यासाठीची अर्जप्रक्रिया 7 जूनपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 ही असणार आहे. एकूण ९९९५ पदांवर भरती होणार असून, ही पदे प्रामुख्याने बँकिंग अधिकारी, सीए, पीओ, कायदा अधिकारी इत्यादीसाठी आहेत. ही सर्व पदे 43 वेगवेगळ्या बँकांसाठी आहेत.
किती आहे परीक्षा शुल्क?
याबाबतच अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी, तुम्हाला ibps.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. संबंधित पदांसाठीची निवड ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. याशिवाय या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी 850 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या 3 हजार अप्रेंटिस पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज भरायचा आहे. ते अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच १७ जून २०२४ आहे. फॉर्म भरण्यासाठी nats.education.gov.in संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
बँक ऑफ बडोदा भरती 2024
बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2024 असणार आहे. अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. बँक ऑफ बडोदाच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 24 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. निवड परीक्षेद्वारे होईल.
एसबीआय भरती 2024
स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्रेड फायनान्स ऑफिसर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 150 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठीची अर्जप्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 असणार आहे. एसबीआयच्या या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. असेच वयोमर्यादा 23 ते 32 वर्षे इतकी असणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.