फोटो सौजन्य - Social Media
नीता परब, मुंबई , नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कलाशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एएसी – कला शिक्षण मध्ये रेखा व रंगकला , शिल्पकला, वस्त्रकला , मातकाम , अंतर्गत गृहसजावट, धातुकला , उपयोजित कला या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
विलास बाळकृष्ण तवटे राज्यात सर्वप्रथम
कलाशिक्षणाच्या या सीईटी परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलास बाळकृष्ण तवटे या विद्यार्थ्याने १९० पैकी १६३ गुण मिळवून तो राज्यात सर्वप्रथम आला आहे. सर्वोच्च गुण घेणारा कलाशिक्षणाच्या या सीईटीमध्ये तो एकमेव विद्यार्थी आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील १८२ विद्यार्थ्यांनी ही सीईटी परीक्षा दिली, यामध्ये पश्चिम बंगाल मधील हुगळी मधील संचिता या विद्यार्थिनीने १५८ गुण घेतले आहेत.
सदरचा निकाल सर्व विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल.
कला शिक्षणाच्या सीईटी प्रवेश परीक्षा १२ एप्रिल २०२६ रोजी एकाच सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण २ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत २ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ९९४ विद्यार्थी आहेत व १ हजार ५८७ विद्यार्थिनी आहेत. कलाशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे. या कलाशिक्षणाच्या सीईटीला ८९.८७ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हि सीईटी परीक्षा राज्यातील २ हजार ३९९ तर राज्याबाहेरील १८२ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली.






