फोटो सौजन्य - Social Media
अभिमान… गर्व… हे दोन्ही शब्द मराठी जणांच्या मनात आणि हृदयात ठासून भरलेले आहेत आणि ते असलेच पाहिजे. महाराष्ट्राच्या या मराठी मातीने या देशाला काय नाय दिलं. रयतेचा राजा दिला, घटनेचा अधिपती दिला, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिलं, जगाला आकाशात उंच झेप घेण्यासाठी विमान दिलं. पहिली महिला डॉक्टर असो किंवा हिंदुस्थानी संगीतातील स्वर कोकिळा असो… क्रिकेटच्या मैदानाचा राजा असो किंवा भारतीय सिनेसृष्टीचा पाया हे सगळं काही मराठीच! जगभरात आपल्या मराठी रक्ताच्या पराक्रमाचे धडे दिले जातात. देशभरात आपल्या मराठी रक्ताचे पराक्रम पाहून तरुण वेडे होतात. अशा या मराठी मातीत जन्म घेण्याचे भाग्य आपल्या नशिबी आले तर आपल्याहून नशिबवान कोण? फक्त गर्व नाही तर आपण माज बाळगला पाहिजे मराठी असल्याचा…
“गतजन्माची पुण्याई, जन्म मराठीत लाभले।
पुण्य माझे शत जन्माचे, सार्थकी हे जाहले।
हे भाग्य म्हणावे की कर्म माझे, मी मराठी जाहलो,
धन्य माझी ती माय मराठी, जिच्या पोटी मी आलो।”
ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज! यांच्या जयंतीनिमित मराठी राजभाषेचा गौरव साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे मराठी भाषेसाठी फार महत्वाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे त्या प्रत्येक लेखणीचा गौरव आहे, ज्या लेखणीने मराठी साहित्यात भर टाकली आहे. हा गौरव वीरतेचा आहे, जो प्रत्येक मराठी माणसांच्या रक्तात ठासून भरला आहे. आज राज्यात जागोजागी माय मराठीचा गौरव साजरा करण्यासाठी संपूर्ण मराठी जण एकत्र येतात. पण मराठी भाषेचा इतिहास इतका गौरवशाली आहे की तिचा गौरव करण्यासाठी वर्षाचे 365 दिवसही अपुरे आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी एकत्र येणे फार गरजेचे आहे. खरं तर, मराठी माणसांनी एकत्र येणे आणि एकजुटीने राहणे हाच खरा माय मराठीचा गौरव आहे.
आता एकमेकांचे पाय खेचून नाही तर एकमेकांना वर जाण्यासाठी खांद्याचा आधार देण्याची वेळ आली आहे. कला असो वा क्रीडा असो या क्षेत्रात आपलीच हवा आहे. परंतु, हीच हवा आता व्यवसाय क्षेत्रात दाखवण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठीचा गौरव करू इच्छिता तर व्यवसाय क्षेत्रात मराठीचा झेंडा रोवून दाखवाच. फडकवा भगवा माय मराठीचा त्या व्यवसाय क्षेत्रात आणि दाखवा या जगाला की मराठी माणसं व्यवसायातही मागे नाही आहेत. मराठी राजभाषेचा गौरव करत, या मराठी मातीत जन्म दिल्याबद्दल देवाचे आभार मानत, या श्रेष्ठ जेष्ठ माझ्या माय मराठीला मानाचा मुजरा!
जय शिवराय!!! जय महाराष्ट्र!!!