फोटो सौजन्य - Social Media
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, तसेच आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक कोळसकर, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आदी उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर देत परदेशी भाषा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार विद्यापीठाने करावा, असे सुचवले. शिक्षण प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलऐवजी परिणाम आधारित मॉडेलकडे जाईल, यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि उद्योजक होण्यासाठी मदत होईल. 2036 पर्यंत उच्च शिक्षणात 50% नोंदणी साध्य करण्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण महत्त्वाचे ठरेल. विद्यापीठ गृहिणी, कामगार, आदिवासी, बंदिजनांसाठी शिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहे. अभ्यासक्रमात नवकल्पना समाविष्ट करून विद्यापीठाचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्याबाबत शासनाला सूचना करण्यात येतील, असे राज्यपालांनी सांगितले.
डॉ. कोळसकर यांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शिक्षणात मोठे बदल होत असल्याचे सांगितले. त्यांनी विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरावर प्रकाश टाकला, ज्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक संधी निर्माण होत आहेत. डिजिटल शिक्षणामुळे भौगोलिक अडथळे दूर होत असून, कोणत्याही ठिकाणाहून उच्च शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.
कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे आणि त्याद्वारे आदिवासी, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत ज्ञान पोहोचविणे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तन उपक्रमामुळे भविष्यात 1 कोटीहून अधिक विद्यार्थी विद्याशाखांशी जोडले जातील, असेही ते म्हणाले.
यावेळी विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्यांना सन्मानपूर्वक पदके प्रदान करण्यात आली. या समारंभात विद्यापीठाच्या 96 अभ्यासक्रमांतील एकूण 1,39,218 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 60 वर्षांवरील 195 विद्यार्थ्यांचा समावेश होता, ज्यांनी वयाची मर्यादा ओलांडून शिक्षण घेण्याचा ध्यास कायम ठेवला. याशिवाय, विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 33 बंदिजनांनी शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
एकूण पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये 15,370 पदविकाधारक, 91,197 पदवीधारक, 32,643 पदव्युत्तर पदवीधारक आणि 8 पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, यामध्ये 121 दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनीही आपल्या मेहनतीने यश संपादन केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत संधी उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे हे यशस्वी उदाहरण ठरले.