फोटो सौजन्य - Social Media
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपली झगमगती करिअर सोडून आयुष्यात नवा मार्ग निवडला आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे एच. एस. कीर्तना! जिने लाइट्स-कॅमेरा-अॅक्शनच्या दुनियेत नाव कमावले आणि नंतर अभिनय सोडून IAS अधिकारी बनण्याचा धाडसी निर्णय घेतला.
कीर्तनाने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने गंगा-यमुना, कर्पूरदा गोम्बे, कनूर हेग्गडती, सर्कल इन्स्पेक्टर, मुथिना अलीया, ओ मल्लिगे, लेडी कमिशनर, जननी, सिगुरु, सिम्हाद्री, आणि पुतानी एजंट यांसारख्या कन्नड मालिकांमध्ये काम केले. याशिवाय ती तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येदेखील झळकली. तमिळ स्टार रमेश अरविंद यांच्यासोबत तिने अनेक चित्रपट केले. केवळ १५व्या वर्षीच तिने ४८ टीव्ही मालिका आणि ३२ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेतली.
त्यानंतर कीर्तनाने सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. लोकांना तिचा हा निर्णय ऐकून धक्का बसला, पण कीर्तनाने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले. तिने सर्वप्रथम कर्नाटक राज्य प्रशासनिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि दोन वर्षे सरकारी नोकरी केली. त्यानंतर UPSC च्या तयारीस सुरुवात केली. पहिल्या पाच प्रयत्नांत अपयश आले, पण ती कधीच खचली नाही. अखेर साल 2020 मध्ये सहाव्या प्रयत्नात तिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 167वी रँक मिळवली.
IAS म्हणून तिची पहिली नियुक्ती मांड्या (कर्नाटक) येथे सहाय्यक आयुक्त म्हणून झाली. सध्या ती चिक्कमगलुरु जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर कार्यरत आहे. तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने ती आज हजारो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. एच. एस. कीर्तना हिने दाखवून दिलं की, यश फक्त ग्लॅमरच्या दुनियेतच नाही, तर सेवा आणि समर्पणाच्या मार्गावरही मिळवता येतं.