फोटो सौजन्य - Social Media
राज्य विज्ञान संस्था नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम, विज्ञान अध्यापक मंडळ, जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच ज्ञानेश्वर माऊली विद्यालय, कोंडाळा महाली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक काळेकर याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माध्यमिक दिव्यांग गटात ‘होम सिक्युरिटी अलार्म’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी त्याला प्रथम क्रमांक मिळाला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्याची निवड झाली आहे.
वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन १५ व १६ जानेवारी रोजी श्री ज्ञानेश्वर माऊली विद्यालय, कोंडाळा महाली येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपले संशोधनाधारित विज्ञान प्रकल्प सादर केले. त्यामध्ये प्रतीक काळेकरने सादर केलेला ‘होम सिक्युरिटी अलार्म’ हा प्रकल्प परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. घराच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प कमी खर्चिक, सोपा आणि प्रभावी असल्याने त्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
या यशामुळे प्रतीकची निवड राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनासाठी झाली असून हे प्रदर्शन २८ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथील श्री शिवाजी विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातून राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
प्रतीकने हे यश मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय भड यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवले. प्रकल्पाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष निर्मितीपर्यंत विजय भड यांनी दिलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरल्याचे प्रतीकने सांगितले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात आमदार किरण सरनाईक, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, अकोला विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर, बाल विज्ञान परिषदेचे डॉ. रवींद्र मुकवाने तसेच ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. यू. कव्हर यांच्या हस्ते प्रतीक व त्याचे मार्गदर्शक विजय भड यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रतीकने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष योगेश खोपे, मुख्याध्यापक विजय भड, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच गावकरी मंडळी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे हे यश असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.






