मुंबईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेला रजनीश हा ऑटोचालकाचा मुलगा आहे. त्याचे वडील पूर्वी पानटपरी चालवत होते. घरची परिस्थिती इतकी बिकट की, महागडं कोचिंग घेणं शक्यच नव्हतं. पण त्याने परिस्थितीला शरण न जाता, चिकाटी, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर JEE 2025 मध्ये 96.2% गुण मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
त्याच्या यशामागे केवळ त्याची मेहनत नव्हे, तर कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) ची भूमिका देखील महत्त्वाची होती. त्यांनी त्याला अभ्यासासाठी लॅपटॉप, साहित्य, आणि एक वैयक्तिक मार्गदर्शक दिला. “माझ्यावर माझा विश्वास राहिला नव्हता, पण रागिनी मॅडमना माझ्यावर विश्वास होता,” असं तो अभिमानाने सांगतो.
रजनीशची JEE ची तयारी ऑनलाइन कोर्समधून झाली. सुरुवातीला उशिरा सुरुवात झाली, ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये अडचणी आल्या, झोपेचा वेळ बिघडला आणि गुण कमी येऊ लागले. शिक्षकांनी शंका व्यक्त केली, नातेवाईकांनी टवाळी केली. पण त्याने हार मानली नाही. पहिल्या प्रयत्नात 120 गुण (94%) मिळवले, नंतरच्या प्रयत्नात मेहनत अधिक वाढवत 153 गुणांसह 96.2% मिळवले.
त्याच्या वर्गातील इतर सात जणांपैकी फक्त रजनीश आणि एक मित्र बारावीपर्यंत पोहोचले. बाकीच्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. रजनीशने मात्र धीर सोडला नाही. “महागडं कोचिंग लागते असं काही नाही,” रजनीश म्हणतो. “तुम्हाला हवा असतो विश्वास, शिस्त, आणि कोणी तरी तुमच्यावर विश्वास ठेवणारा. माझ्यासाठी ते होतं KEF आणि रागिनी मॅडम.” रजनीशने केवळ JEE परीक्षा पास केली नाही तर त्याने आपलं भविष्यच नव्याने घडवलं.
रजनीशची ही यशोगाथा प्रत्येक त्या तरुणासाठी प्रेरणा आहे जो आर्थिक मर्यादांमध्येही मोठं स्वप्न पाहतो आणि जिद्दीने ते पूर्णही करतो. रजनीशने JEE मध्ये इतके जास्त गन मिळवत त्याच्या कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे नाव उज्वल केले आहे. त्याची ही संघर्षगाथा तसेच यशोगाथा ही अनेक तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे .