सोजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : ग्रामीण भागातील शेतीपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या डीपी (रोहित्र) फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. टोळीतील तिघांना ताब्यात घेऊन २४२ किलो तांब्याच्या तारांसह इर्टिगा कार असा १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे चार गुन्ह्यांची उकल झाली. मोहम्मद तय्यब मोहम्मद शफी शहा (२८, सध्या रा. चिखली, मूळ रा. उत्तर प्रदेश), मैनुद्दीन खलील शहा (३५, सध्या रा. कुदळवाडी, चिखली, मूळ रा. उत्तर प्रदेश) आणि सुफियान जमीरुल्ला खान (वय १९, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
शेतीपंपांसाठी उभारण्यात आलेली रोहित्रे निर्जन तसेच शेतालगतच्या भागात असल्याने चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात होते. रोहित्र फोडून आतील तांब्याच्या तारा चोरून नेल्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच संबंधित भागातील शेतीपंपांचा वीजपुरवठा विस्कळीत होण्याची समस्या निर्माण होत होती. ऐन शेतीच्या कामांसाठी विजेची आवश्यकता असताना रोहित्रांवर डल्ला पडत असल्याने हे प्रकार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला डीपी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी अधिकारी आणि अंमलदारांना डीपी चोरीच्या गुन्ह्यांची माहिती संकलित करून गोपनीय बातमीदार सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान श्रेणी पोलिस उपनिरीक्षक महेश खांडे आणि पोलिस हवालदार नितीन लोखंडे यांना महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली. टोळीतील संशयित चोरी केलेल्या तांब्याच्या तारा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याचे समजले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी देहूरोड फूड प्लाझा परिसरात सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. कारची तपासणी केली असता २४२ किलो तांब्याच्या तारा आढळून आल्या. पोलिसांनी तांब्याच्या तारांसह कार जप्त केली. या मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ४२ हजार रुपये आहे. तिघांकडे अधिक चौकशी केली असता दक्षिण चाकण पोलीस ठाण्यातील एक आणि उत्तर चाकण पोलीस ठाण्यातील तीन अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली. चारही गुन्ह्यांतील चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
कारवाई करणारे पथक
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलिस अंमलदार सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रवीण कांबळे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, गणेश कोकणे, पवन वाजे, विनोद वीर, हर्षद कदम, समीर रासकर, अमर कदम, मोहसीन अत्तार, अमोल गोरे आणि अशोक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.






