फोटो सौजन्य - Social Media
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी असून इतरांनीही त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. शासकीय निवासस्थानी आयोजित गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील युवक मोठ्या संधी गाठत असून, त्यांच्या प्रगतीतून समाजाच्या उन्नतीला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उपलाट गावातील श्रेयस पाटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वारली समाजातील श्रेयसने बी.कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले असून यूकेमधील University of Bristol आणि University of Southampton येथे एमएससी डेटा सायन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली आहे. ग्रामीण भागातून येऊन आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सुशांत आत्राम या विद्यार्थ्याचाही सत्कार करण्यात आला. Fergusson College, पुणे येथून बीएससी कॉम्प्युटर सायन्स पूर्ण केलेल्या आत्रामने एक वेब टूल विकसित केले असून त्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कामगिरीमुळे त्याच्या नवोन्मेषी विचारसरणीचे कौतुक करण्यात आले.
याशिवाय विवेक पडवले या विद्यार्थ्याने Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2026 परीक्षेत डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांमध्ये यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील झेप अधोरेखित होत असल्याचे सांगण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशातून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन डॉ. वुईके यांनी केले.






