फोटो सौजन्य - Social Media
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना 23 डिसेंबर, 2024 ते 11 जानेवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ग. ल. तरतरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व इच्छुकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज प्रक्रिया www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://doaonline.co.in/LDMIC/ या लिंकवरून पूर्ण करता येईल. अर्ज करताना उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती घेत राहणे गरजेचे आहे.
संगीत महाविद्यालयाने सुरू केलेल्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता आणि उपयुक्तता राखण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाचे अध्यक्षपद प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांच्याकडे आहे, तर सदस्य म्हणून सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदिनाथ मंगेशकर आणि मयुरेश पै हे आहेत. महाविद्यालयाचे कला संचालनालयाचे संचालक संतोष क्षीरसागर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
महाविद्यालयात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, पियानो/कीबोर्ड वादन, संगीत निर्मिती, आणि ध्वनी अभियांत्रिकी असे विविध अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 25 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असून, वार्षिक शुल्क 5400 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, सलिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी शनिवार-रविवार या दिवशी शिकवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली असून प्रवेश शुल्क 20,000 रुपये इतके आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील.
प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ऑडिशन प्रक्रिया आणि इतर माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला नियमित भेट देऊन अद्ययावत माहिती घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. संगीत क्षेत्रात भविष्य घडविण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम एक उत्तम संधी ठरणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमांसह महाविद्यालयाने विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने उत्कृष्ट शैक्षणिक पायाभूत सुविधा देण्याचा निर्धार केला आहे.