फोटो सौजन्य - Social Media
देश सेवेची ओढ, आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न आणि सन्मानित वर्दीत काम करण्याची महत्त्वाकांक्षा अनेक तरुणांच्या मनात असते. अशाच तरुणांसाठी भारतीय वायुदल एक उत्तम करिअरचा पर्याय ठरतो. येथे केवळ शौर्य आणि देशभक्तीच नाही, तर जबाबदारीची भूमिका, भरघोस पगार, विविध भत्ते आणि सामाजिक प्रतिष्ठाही मिळते. त्यामुळेच दरवर्षी लाखो युवक वायुदलात भरती होण्यासाठी अर्ज करतात.
भारतीय वायुदलात ऑफिसर पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीतही पगार दिला जातो. वायुदलाच्या अधिकृत माहितीनुसार, प्रशिक्षणाच्या शेवटच्या वर्षात दरमहा 56,100 रुपये पगार मिळतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, उमेदवार फ्लाइंग ऑफिसर या हुद्द्यावर कार्यभार स्वीकारतो. या पदावर वेतन ₹56,100 पासून सुरू होऊन ₹1,77,500 पर्यंत असते. त्यानंतर जेव्हा अधिकारी वरिष्ठ पदांवर जातो, तेव्हा त्याच्या वेतनात मोठी वाढ होते.
उदाहरणार्थ, फ्लाइंग लेफ्टनंटला ₹61,300 ते ₹1,20,900, स्क्वॉड्रन लीडरला ₹69,400 ते ₹1,36,900 आणि विंग कमांडरला ₹1,16,700 ते ₹2,08,700 इतका पगार मिळतो. ग्रुप कॅप्टन, एअर कोमोडोर, एअर वाइस मार्शल आणि एअर मार्शल या हुद्द्यांवर अधिकाऱ्यांचा पगार ₹1.3 लाखांपासून सुरू होऊन ₹2.24 लाखांपर्यंत पोहोचतो. वायुदलातील सर्वोच्च पद असलेल्या एअर चीफ मार्शलला दरमहा ₹2,50,000 इतका स्थिर पगार दिला जातो.
पगारासोबतच वायुदलात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विविध प्रकारचे भत्तेही दिले जातात, जे त्यांचा आर्थिक स्तर अधिक भक्कम करतात. या भत्त्यांमध्ये ट्रान्सपोर्ट अलाउन्स, घरभाडे भत्ता (HRA), तसेच मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाणारा विशेष भत्ता यांचा समावेश होतो. अधिकाऱ्यांची पोस्टिंग जर दुर्गम किंवा संवेदनशील भागात झाली असेल, तर त्यांना फील्ड एरिया भत्ता, सियाचिन भत्ता, हिल एरिया अलाउन्स, आयलंड ड्युटी भत्ता, स्पेशल फोर्स अलाउन्स आणि टेक्निकल अलाउन्ससारखे अतिरिक्त लाभ दिले जातात. यामुळे अशा कठीण भागांमध्ये सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळते. याशिवाय, फ्लाइंग ऑफिसरपासून ते एअर कोमोडोर या रँकपर्यंत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना दरमहा 15,500 रुपयांचा ‘मिलिटरी सर्व्हिस पे’ (MSP) म्हणून एक वेगळा भत्ता दिला जातो, जो सैन्य दलाच्या इतर शाखांमध्येही दिला जातो. केवळ सन्मान आणि देशसेवा एवढ्यावरच न थांबता, भारतीय वायुदल अधिकारी म्हणून काम करणं हे आर्थिक स्थैर्य, उत्तम सामाजिक दर्जा आणि सुरक्षित भविष्याची हमी देणारा पर्याय मानला जातो. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीला वायुदलात करिअर करणे हे फक्त एक स्वप्न न राहता, एक प्रेरणादायी आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर मार्ग ठरतो.