सौजन्य - सोशल मिडीया
सोमेश्वरनगर : बारामती तालुका पंचायत समितीची सभापतपदाची निवड लवकरच पार पडणार आहे. पणदरे गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले किरण तावरे व निंबूत गणातून निवडून आलेले वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप हे सभापतीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अभुतपुर्व यश मिळवले आहे.
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा व पंचायत समितीच्या दहा जागा विक्रमी मताधिक्याने जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती हा राष्ट्रवादीचा अभेद्य गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या बारा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षासाठी दोन जागा सोडल्या. त्या दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले.
अजितदादांच्या अकाली निधनानंतर पंचायत समितीच्या सभापतीची निवड करण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निवडून आलेल्या दहा सदस्यांपैकी एका सदस्याची सभापतीपदी निवड होणार आहे. पणदरे गणातून निवडून आलेले सदस्य किरण तावरे यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. किरण तावरे यांनी २९ वर्षे पक्ष संघटनेत सक्रियपणे काम केले आहे तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नऊ वर्षे प्रभावीपणे काम केले आहे. त्यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यात सक्रियपणे पुढे असायचा.
संजय गांधी निराधार योजनेचे बारामती तालुका अध्यक्ष म्हणूनही किरण तावरे यांचे काम उठावदार होते. तालुक्यातील अनेक गरजू लोकांना त्यांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. सलग पाच वर्ष मोफत पोलीस भरती मेळावा, चौदा वर्षे सांगवी ते तुळजापूर पदयात्रा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले होते. अनेक निवडणुकांत नियोजनाची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय व निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. अभ्यासू व सर्वसमावेशक व्यक्तिमत्व, तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
सरपंचपदाच्या कार्यकाळात कौतुकास्पद काम
तर दिग्विजय जगताप बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील वाणेवाडी सारख्या महत्वाच्या गावातून येतात. त्यांच्या पत्नी गीतांजली वाणेवाडी गावाच्या विद्यमान सरपंच असून, स्वतः दिग्विजय जगताप हेही माजी सरपंच आहेत. आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी कौतुकास्पद काम केले होते. मितभाषी व प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या पाठीमागे असणारी तरुणांची मोठी फळी तसेच तालुक्याच्या पश्चिम भागात असलेला मोठा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. या दोन नावांशिवाय वडगाव निंबाळकर येथील जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वडगाव निंबाळकर गणातून मोठ्या फरकाने विजयी झालेले उमेदवार जितेंद्र पवार यांचेही नाव चर्चेत असून, कुणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार हे थोड्याच काळात दिसेल.






